नालासोपाऱ्यात वाहन चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक, ५ गुन्हयांची उकल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 04:58 PM2023-08-12T16:58:46+5:302023-08-12T16:58:55+5:30
पोलिसांनी आरोपीकडून पाच गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी शनिवारी दिली आहे.
मंगेश कराळे
नालासोपारा :- वाहने चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी आरोपीकडून पाच गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी शनिवारी दिली आहे.
माणिकपुरच्या रॉकी चाळ येथे राहणाऱ्या अभय महेन्द्र राजभर (२२) या तरुणाची ७० हजार रुपये किंमतीची दुचाकी ४ ऑगस्टला दुपारी शास्त्रीनगर परिसरातून चोरीला गेली होती. माणिकपूर पोलिसांनी याप्रकरणी वाहन चोरीचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस आयुक्तालय अंतर्गत वाहन चोरी होण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने त्यांना प्रतिबंध करणाच्या अनुषंगाने व दाखल गून्हयांची उकल करण्याबाबत वरिष्ठांनी सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे वर नमुद दाखल वाहन चोरीच्या गुन्हयाचा समांतर तपास मध्यवर्ती गुन्हे शाखा करत होती.
त्याअनुषंगाने सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय सरक व स्टाफ असे घटनास्थळ व घटनास्थळाचे आजुबाजुच्या सीसीटीव्ही कॅमेरे फुटेजची तपासणी व मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी निष्पन करुन बिलालपाड्याच्या ओम साई नगर येथे शुक्रवारी सापळा रचून नंदकिशोर उर्फ राहुल अशोक सिंग (२२) याला ताब्यात घेतले. आरोपीकडे तपास केल्यावर वरील गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीकडे अधिक तपास केल्यावर त्याने चोरी केलेल्या दोन दुचाकी व तीन ऑटो रिक्षा असा एकुण ३ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तालयातील आरोपीकडून ५ गुन्ह्यांची उकल केली आहे.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल राख, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत जेधे, पोलीस हवालदार गोविंद केन्द्रे, शिवाजी पाटील, राजाराम काळे, सतिश जगताप, अनिल नागरे, जयकुमार राठोड, हनुमंत सुर्यवंशी, सचिन चौधरी यांनी केलेली आहे.