वाहनांची वर्धा जिल्ह्यात चोरी अन् वाशिम जिल्ह्यात विक्री, दोघांना अटक
By सुनील काकडे | Published: July 5, 2024 06:16 PM2024-07-05T18:16:57+5:302024-07-05T18:17:20+5:30
एक आरोपी फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वाशिम : वर्धा जिल्ह्यातील गावांमधून वाहन चोरायचे आणि ते कामरगाव परिसरात मिळेल तितक्या पैशात विकायचे, असा धंदा चोरट्यांनी अवलंबिला होता. आर्वी पोलिसांनी ४ जुलै रोजी जिल्ह्यातील कामरगाव, म्हसला येथील दोघांना याप्रकरणी अटक केली असून १८ दुचाकी वाहने जप्त केली आहेत. एक आरोपी फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अलिकडच्या काही वर्षांत राज्यभरात दुचाकी वाहन चोरीच्या घटनांचा आलेख वाढला आहे. पोलिसही त्यादृष्टीने ‘ॲक्शन मोड’वर आले आहे. मिळालेल्या गोपनिय माहितीवरून आर्वी पोलिसांच्या डी.बी. पथकाने ४ जुलै रोजी धनज पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या कामरगाव येथे येवून सै. सलमान (२२, रा. म्हसला, ता. कारंजा) व मो. फैजान मो. फिरोज (२०, रा. कामरगाव) या दोघांना अटक केली; तर
या प्रकरणातील एक मुख्य आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला. ताब्यात घेतलेल्या आरोपिंकडून १८ दुचाकी वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. या कारवाईमुळे कामरगावसह परिसरातील अन्य गावांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.
चोरीच्या वाहनांची विक्री; नागरिक धास्तावले
कामरगाव आणि परिसरात चोरीच्या दुचाकी व चारचाकी वाहनांची विक्री होत असल्याचा संशय कुणालाही नव्हता. मात्र, आर्वी पोलिसांकडून झालेल्या मोठ्या कारवाईमुळे हे सत्य उजेडात आले. यामुळे नागरिकही धास्तावले असून खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.