वेरॉन समूहावर छापे, १२ कोटीची मालमत्ता जप्त; मुंबई, नागपूर, पुण्यात ED ची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 06:39 AM2023-05-04T06:39:34+5:302023-05-04T06:39:50+5:30
या प्रकरणी कंपनी व प्रवर्तकांविरोधात सीबीआयने तीन गुन्हे दाखल केले होते. मात्र, यातील आर्थिक व्यवहारांची मर्यादा पाहता गेल्या वर्षी मे महिन्यात ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.
मुंबई : बँकांकडून कर्ज घेत तब्बल तीन हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी पुणेस्थित वेरॉन समूहाची पुणे, नागपूर, रत्नागिरी आणि गोवा येथील १२ कोटी ८० लाख रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) मंगळवारी जप्त केली. कंपनीचा आतापर्यंतच्या जप्तीचा आकडा १७९ कोटी २७ लाख रुपयांवर पोहोचला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, कॅनरा बँकेसह आणखी काही बँकांकडून कंपनीच्या विस्तारासाठी कंपनीचे प्रवर्तक एस. पी. सवईकर (आता मृत झालेले) यांनी महाकाय कर्ज घेतले होते. कालांतराने हे कर्ज थकले; परंतु तरीही काही बँक अधिकाऱ्यांशी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे मोठ्या रकमेचे ‘लेटर ऑफ क्रेडिट’ मिळवले होते. या माध्यमातून कंपनीला जे पैसे मिळाले त्या पैशांचा वापर कंपनीने विस्तारासाठी न करता त्यातून काही प्रमाणात जुने कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला तर उर्वरित पैसे अन्य ठिकाणी फिरवत वैयक्तिक मालमत्तांची खरेदी केल्याचा ठपका कंपनीवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी कंपनी व प्रवर्तकांविरोधात सीबीआयने तीन गुन्हे दाखल केले होते. मात्र, यातील आर्थिक व्यवहारांची मर्यादा पाहता गेल्या वर्षी मे महिन्यात ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.
सुरुवातीला १६६ कोटींची मालमत्ता जप्त
प्राथमिक तपासादरम्यानच कंपनीने मनी लाँड्रिंग केल्याचे दिसून आल्यावर ईडीने १६६ कोटी ४७ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे, तर त्यानंतर अधिक माहिती प्राप्त झाल्यानंतर मंगळवारी ईडीने कंपनीची आणखी १२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. या जप्तीच्या कारवाईमध्ये नागपूर, पुणे, रत्नागिरी आणि गोवा येथील भूखंडांचा समावेश आहे.