२९८ कोटींच्या फसवणूकप्रकरणी व्हीजीएनच्या व्यवस्थापिकेला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 10:19 AM2022-03-09T10:19:04+5:302022-03-09T10:19:20+5:30

आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई : ठाणे परिसरातील १४ हजार ३४० गुंतवणूकदारांना गंडा

VGN manager arrested in Rs 298 crore fraud case | २९८ कोटींच्या फसवणूकप्रकरणी व्हीजीएनच्या व्यवस्थापिकेला अटक

२९८ कोटींच्या फसवणूकप्रकरणी व्हीजीएनच्या व्यवस्थापिकेला अटक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : अल्पावधीतच जास्त पैसे तसेच सोने देण्याच्या योजनांचे प्रलोभन दाखवून तब्बल १४ हजार ३४० गुंतवणूकदारांकडून २९८ कोटी ९६ लाख ९२ हजार २६४ रुपयांची  फसवणूक करणाऱ्या व्हीजीएन ज्वेलर्स प्रकरणातील वॉन्टेड आरोपी व्यवस्थापिका लीना पिटर हिला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. अशी माहिती पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी मंगळवारी दिली. 

 लोकांना सोने आणि इतर योजनांचे आमिष दाखवून  विरीथगोपालन नायर आणि वत्सला नायर यांनी व्हीजीएन ज्वेलर्स नावाने वित्तीय संस्था सुरू केली होती. डोंबिवली पूर्व, उल्हासनगर आणि मुंबईतील मुलुंडमध्ये ही दुकाने होती. यातील मुख्य सूत्रधार तथा आरोपी विरीथगोपालन नायर याने २००६ ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत या दुकानात येणाऱ्या ग्राहकांना दरमहा पाचशे रुपयाप्रमाणे २४ महिने गुंतविल्यास १२ हजारांच्या बदल्यात १४ हजार रुपये मिळतील किंवा तितक्याच रकमेचे सोने देण्यात येईल. तसेच एक ते पाच वर्षांच्या मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक केल्यास वार्षिक १५५ टक्के दराने व्याज देण्याचे आमिष दाखविले होते. नव्या गुंतवणूकदारांचे पैसे जुन्या गुंतवणूकदारांना व्याजाच्या स्वरुपात परत दिले जायचे. मात्र,  गुंतवणुकीची रक्कम आणि त्यावरील परतावा परत न देता ६६ लाख ३६ हजार ५०० रुपयांच्या रकमेच्या फसवणुकीचा गुन्हा कोळसेवाडी पोलीस ठाण्यात २०२१ मध्ये दाखल झाला होता.

पोलिसांचे आवाहन 
सोन्याची दुकाने, सोन्यामधील गुंतवणुकीची योजना तसेच इतर योजनांद्वारे अवाजवी परतावा आणि गुंतवणुकीच्या फसव्या आमिषाला गुंतवणूकदारांना फसवू शकतात. अशा कोणत्याही आमिषाला नागरिकांनी बळी पडू नये. तसेच व्हीजीएन ज्वेलर्सच्या गुंतवणूकदारांनी ठाणे शहर आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

मुख्य सूत्रधाराला यापूर्वीच अटक
यापूर्वी व्हीजीएन ज्वेलर्सचा मालक विरीथगोपालन याला ५ ऑक्टोबर २०२१ मध्ये आणि त्याचा मुलगा गोविंदगोपालन याला २ डिसेंबर २०२१ रोजी अटक झाली. आता ७ मार्च २०२२ रोजी यातील वॉन्टेड व्हीजीएन ज्वेलर्सची व्यवस्थापिका लीना पीटर हिला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. तिला ११ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त सुनील लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत सावंत आणि सहायक पोलीस निरीक्षक विक्रम कोळी आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

४६ कोटींची पाच स्थावर मालमत्ता जप्त
आतापर्यंत १४ हजार ३४० गुंतवणूकदारांची २९८ कोटी ९६ लाख ९२ हजार २६४ रुपये इतकी फसवणूक झाली. आरोपींच्या आठ बँकांमधील २८ बँक खाती गोठवून त्यातील २४ लाख १८ हजार ५०३ इतकी रक्कम गोठविली आहे. तसेच ४६ कोटींची पाच स्थावर मालमत्ताही जप्त केली आहे. विरीथगोपालन याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून ४२ कोटींपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.

Web Title: VGN manager arrested in Rs 298 crore fraud case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.