विदर्भ, देवगिरी एक्स्प्रेसमध्ये आमदारांचे साहित्य चोरीला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 06:07 AM2019-06-26T06:07:33+5:302019-06-26T06:07:52+5:30
पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईला आलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील दोन आमदारांकडचे साहित्य प्रवासादरम्यान चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार उघड झाला.
डोंबिवली - पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईला आलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील दोन आमदारांकडचे साहित्य प्रवासादरम्यान चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार उघड झाला. हा प्रकार कल्याण ते ठाणे रेल्वेस्थानकांदरम्यान विदर्भ, आणि देवगिरी एक्स्प्रेसमध्ये सोमवारी सकाळी घडला. दोन्ही आमदारांनी याप्रकरणी सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
मलकापूर येथून रविवारी चिखली मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे हे पत्नी वृषाली यांच्यासह विदर्भ एक्स्प्रेसने निघाले. तर, शिवसेनेचे मेहकर मतदारसंघाचे आमदार संजय रायमूलकर आणि सिंदखेडाराजा मतदारसंघाचे आमदार शशिकांत खेडेकर जालन्याहून देवगिरी एक्स्प्रेसने सोमवारी मुंबईला पोहचले. सोमवारी सकाळी ७ वाजता कल्याण स्थानकात उतरत असताना त्यांच्या पत्नीजवळील पर्स हिसकावून चोरट्याने पळ काढला. बोंद्रे यांच्याकडील महत्त्वाची कागदपत्रे असलेली फाइलही लांबवली. चोरट्याचा पाठलाग करण्याचा बोंद्रे यांनी प्रयत्न केला. पर्समध्ये २६ हजारांची रोकड, एटीएम कार्डसह इतरही साहित्य चोरीला गोल्याची तक्रार मुंबई येथील रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
दुसऱ्या घटनेत देवगिरी एक्स्प्रेसने प्रवास करणारे आमदार रायमूलकर यांना सकाळी जाग आली तेव्हा ५६ हजारांचा मोबाइल आणि दहा हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आले. तसेच आमदार खेडेकर यांच्या बॅगेलाही ब्लेडने कापले असल्याचे लक्षात आले. कल्याण ते ठाणे स्टेशनदरम्यान हा सर्व प्रकार घडला, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित बारटक्के यांनी सांगितले. स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेºयाच्या माध्यमातून पर्स हिसकावणाºया चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे. लवकरच चोरट्यांचा शोध घेण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.