Video : 26/11 Terror Attack मूर्ती लहान कीर्ती महान : कसाब तर मच्छर होता मास्टरमाईंड अजून धडा शिकवायचाय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 08:17 PM2018-11-26T20:17:26+5:302018-11-26T20:18:58+5:30
कसाबला फासापर्यंत पोहोचवण्याच्या कामात मोलाची भूमिका बजावली ती सर्वात कमी वय असलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार देविका रोटावण या तरुणीने. त्यावेळी ती फक्त ९ वर्षांची होती. आता देविका १९ वर्षांची झाली आहे. मात्र, २६/११ हल्ल्यात तिच्या उजव्या पायाला कसाबच्या एके ४७ रायफलमधून लागलेल्या गोळीचे व्रण आणि वेदना अजूनही कायम आहेत.
मुंबई - मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्याला १० वर्षं पूर्ण होत आहे. २६ नोव्हेंबर 2008 ला मुंबईत १० दहशतवाद्यांनी निष्पापांची कत्तल करत हाहाकार माजवला होता. यामध्ये १६४ निष्पाप नागरिक आणि सुरक्षा अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. मुंबई पोलिसांचे कर्तबगार अधिकारी विजय साळस्कर, अशोक कामटे आणि हेमंत करकरे या हल्ल्यात शहीद झाले होते. तुकाराम ओंबाळे यांनी आपल्या प्राणांची आहुती देत अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आलं होतं. कसाबला फासापर्यंत पोहोचवण्याच्या कामात मोलाची भूमिका बजावली ती सर्वात कमी वय असलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार देविका रोटावण या तरुणीने. त्यावेळी ती फक्त ९ वर्षांची होती. आता देविका १९ वर्षांची झाली आहे. मात्र, २६/११ हल्ल्यात तिच्या उजव्या पायाला कसाबच्या एके ४७ रायफलमधून लागलेल्या गोळीचे व्रण आणि वेदना अजूनही कायम आहेत.
माझा जन्म सेंट जॉर्ज रुग्णालयात झाला आणि दहशतवादी हल्ल्यात पायाला गोळी लागल्यानंतर देखील मला त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. माझ्या उजव्या पायाला गोळी लागली, पायाचे हाड मोडले, काही वेळानंतर मी बेशुद्ध पडले. मी त्यावेळी फक्त नऊ वर्षांची होती. बेशुद्ध अवस्थेत मला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नंतर काही शस्त्रक्रियेसाठी जे. जे. रुग्णालयात नेण्यात आलं. आई लहान असतानाच मृत पावली. मी जेव्हा शुद्धीत आली त्यावेळी पप्पा आणि भावाला पाहून मला रडू कोसळलं. पायाला प्रचंड वेदना होत होती. जणू कुणी पायावर दगड ठेवला. त्या एका गोळीने माझं आयुष्य बदलून टाकलं अशी व्यथा देविका हिने मांडली. कसाब तर एक मच्छर होता. या हल्ल्याच्या मास्टरमाईंडला धडा शिकवायचा आहे. या मोठं-मोठ्या दहशतवाद्यांचा मला खात्मा करायचा आहे. मला मोठं होऊन आयपीएस ऑफिसर व्हायचं आहे
तसेच पुढे देविका म्हणाली की, मध्यंतरीच्या काळात मला टीबी झाला. घरची परिस्थिती बेताच त्यात आजार झाला. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पप्पांनी मंत्रालयाचे उंबरठे झिजवले अखेर त्यांनी आर्थिक मदत केली. यात दीड वर्षांचा काळ गेला.जे. जे. रुग्णालयातून उपचार घेऊन आम्ही आमच्या गावी राजस्थानला गेलो होतो. त्यानंतर एकदा पोलिसांचा फोन आला होता. पप्पांना विचारलं साक्ष देणार का ? मी कसाबला पाहिलं होतं. पप्पांनी आणि मी साक्ष देण्याचं ठरवलं. त्यानुसार आम्ही मुंबईत आलो. मी नऊ वर्षांची होते. पायाची जखम भरलेली नव्हती. कुबड्या घेऊन कोर्टात गेले होते. कोर्टात गेल्यावर कसाब बसलेला होता. मी पाहताच त्याला ओळखलं. माझ्यासमोर तीन व्यक्तींना कोर्टात ठेवलं होतं. त्यापैकी कसाब कोण हे मला ओळखायचं होतं. आम्ही कमावून खात होतो आणि सुखी होतो. पण 26/11 च्या घटनेनंतर अचानक सारं काही बदललं. लोकं म्हणायचे तुमच्या दुकानात कुणी बॉम्बस्फोट घडवतील, गोळीबार करतील, वडिलांचा ड्रायफ्रुटचा व्यवसाय होता. साक्ष दिल्यानंतर लोकांनी माझ्या वडिलांना माल देण कमी झालं त्यामुळे त्यांचा व्यवसाय बंद झाला. नातेवाईकही आम्हाला टाळायला लागले. नातेवाईक आम्हाला घरी बोलवत नव्हते. तेही असंच म्हणायचे, तुम्ही दहशतवाद्याविरोधात साक्ष दिली दहशतवादी आमच्यावर हल्ला करतील, तुम्ही आला तर गोळीबार करतील,मनाला खूप दुःख होत असे. माझं शैक्षणिक नुकसानही खूप झालं. मला शाळेत कुणी प्रवेश देत नव्हते. शाळेवाले म्हणायचे तुला प्रवेश दिला तर दहशतवादी शाळा उडवून टाकतील. एका संघटनेनं माझ्यासाठी लढा दिला त्यानंतर मला शाळेत प्रवेश मिळाला. मात्र या लढ्यात माझी चार वर्ष फुकट गेली. शाळेत गेल्यानंतरही भीती वाटायची पण मी हिंमत सोडली नाही, अशी आकांक्षा देविकाने बोलून दाखवली.