Video : डॉग स्कॉडमध्ये ५ नवे डॉग अन् पहिल्यांदा महिला हॅण्डलर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 09:15 PM2019-01-18T21:15:50+5:302019-01-18T21:18:06+5:30
छोट्या डॉगसोबत या महिला पोलिसांना प्रशिक्षण देऊन त्यांची नियुक्ती वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात येणार आहे. तसेच मुंबई पोलीस दलातील डॉग स्कॉडमध्ये कालपासून पाच बेल्जीयम शेफर्ड जातीचे पाच डॉग यांचा समावेश करण्यात आला आहे.
मुंबई - मुंबई पोलिस दलाच्या साठ वर्षांच्या इतिहासात प्रथमच या पथकामध्ये महिलांची नेमणूक केली जाणार आहे. मुंबई पोलिस दलातील १२ महिलांची 'डॉग हँडलर्स' (श्वानांचा सांभाळ करणारे) म्हणून निवड करण्यात आली आहे. छोट्या डॉगसोबत या महिला पोलिसांना प्रशिक्षण देऊन त्यांची नियुक्ती वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात येणार आहे. तसेच मुंबई पोलीस दलातील डॉग स्कॉडमध्ये कालपासून पाच बेल्जीयम शेफर्ड जातीचे पाच डॉग यांचा समावेश करण्यात आला आहे.
मुंबई बहुतांश वेळा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असते. व्हीआयपींचे दौरे कायम सुरू असतात तसेच विविध प्रकारच्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी मुंबई पोलिसांचे डॉग स्कॉड महत्त्वाची भूमिका बजावतात. डॉग स्कॉडचे महत्त्व लक्षात घेता यातील श्वान आणि 'डॉग हँडलर्स'ची संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून या श्वान पथकामध्ये महिला 'डॉग हँडलर्स'ची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी इच्छुक असलेल्या महिला पोलिसांची यादी तयार करण्यात आली. या यादीतून प्राथमिक छाननी करून १२ महिला पोलिसांची निवड करण्यात आली आहे. संरक्षण शाखेचे पोलिस उपायुक्त प्रशांत कदम यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
मुंबई पोलीस दलात तीन वेगवेगळी डॉग स्कॉड आहेत. गुन्हे शाखेसाठी एक स्वतंत्र डॉग स्कॉड असून व्हीआयपी दौरे, सभा यासाठी गोरेगाव येथे स्वतंत्र डॉग स्कॉड आहे. याशिवाय दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट यासाठी प्रशिक्षित केलेले बॉम्बशोधक आणि नाशक पथक आहे. या प्रत्येक पथकाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. गरजेनुसार महिला 'डॉग हँडलर्स'ची या पथकांमध्ये नेमणूक करण्यात येणार आहे.