Video : भ्रष्ट कारभाराविषयी नाराजी; महापालिका मुख्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 03:07 PM2021-06-01T15:07:56+5:302021-06-01T15:53:02+5:30
Attempt of self-immolation : खोट्या तक्रारदारांनाअधिकाऱ्यांची साथ
नवी मुंबई : महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराविषयी नाराजी व्यक्त करत एका व्यक्तीने पालिका मुख्यालयाबाहेर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. खोट्या तक्रारी करून पैसे लाटणाऱ्यांना पालिका अधिकारी देखील साथ देत असल्याचा आरोप करत त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.
सीबीडी येथील पालिका मुख्यालयाबाहेर मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला. घणसोली येथे राहणारे योगेश चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी कोपर खैरणे विभाग कार्यालयात ठिय्या मांडला होता. काही राजकीय व्यक्ती पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्वसामान्यांना लुटत असल्याचा त्यांचा आरोप होता. त्यामुळे खोट्या तक्रारदारांना प्रशासनाने थारा देऊ नये अशी त्यांची मागणी होती. परंतु विभाग अधिकाऱ्यांनी त्यांना प्रतिसाद दिला नव्हता. शिवाय त्यानंतर देखील एकाच व्यक्ती विरोधात अधिकाधिक तक्रार अर्ज करून त्रास देण्याचा प्रकार सुरूच होता. त्यामुळे संतप्त योगेश चव्हाण यांनी मंगळवारी पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच स्वतःवर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तिथे बंदोबस्तावर उपस्थित पोलीस व सुरक्षा रक्षकांनी त्यांना ताब्यात घेतले.
नवी मुंबई - पालिका मुख्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न pic.twitter.com/jFxYMm9blY
— Lokmat (@MiLOKMAT) June 1, 2021
कोपर खैरणे विभाग कार्यालयांतर्गत अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा चव्हाण यांचा आरोप आहे. याबाबत त्यांनी यापूर्वी पालिका आयुक्तांसह पोलीसांना देखील निवेदन दिलेले आहेत. परंतु भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घातले जात असल्याने सर्वसामान्यांची पिळवणूक होत असल्याच्या निषेधार्थ आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे चव्हाण यांनी सांगितले.