Video: "हे बघा"! अर्णब गोस्वामीने दाखविले व्रण; पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप
By हेमंत बावकर | Published: November 4, 2020 06:19 PM2020-11-04T18:19:04+5:302020-11-04T18:23:03+5:30
Arnab Goswami arrest : वरळी येथील अर्णब गोस्वामी यांच्या राहत्या घरी रायगड पोलिसांसह मुंबई पोलीस अधिकारी दाखल झाले. याठिकाणी पोलिसांनी त्यांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबाने पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला.
मुंबई : अलिबागचे इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांच्या आईच्या आत्महत्येप्रकरणी रायगड आणि मुंबई पोलिसांनी आज रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना अटक केली. यावेळी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप गोस्वामी यांनी केला होता. यावर पोलिसांच्या कारवाईवेळचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये पोलीस मारहाण करताना दिसत नव्हते. मात्र, यावर गोस्वामी यांच्या रिपब्लिक चॅनलने नवीन व्हिडीओ पोस्ट केला आहे.
यामध्ये अर्णब गोस्वामी हे उजव्या हातावर उमटलेला व्रण दाखवत आहेत. तसेच त्यांनी पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, सचिन वझे व अन्य सात पोलिसांनी घेरून मानेला धरत घराबाहेर नेले. पायात शुजही घालू दिले नाहीत, असा आरोप केला आहे. गोस्वामी यांना आज सकाळी ७ च्या सुमारास रायगड पोलिसांनी अटक केली.
#WATCH: Republic TV Editor Arnab Goswami shows injury marks, says, "Policemen surrounded me, held me by the scruff of my neck, pushed me. I'm here without shoes...I've been assaulted." #Maharashtra
— ANI (@ANI) November 4, 2020
(Video Source: Republic TV) pic.twitter.com/E4lk5xocbd
2018 मध्ये इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील घरी आत्महत्या केली होती, त्यांच्या मृतदेहाशेजारी अन्वय यांच्या आई कुमूद नाईक यांचाही मृतदेह आढळला होता. याठिकाणी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये आर्थिक बाबींमुळे आत्महत्या केल्याचं उघड झालं, मात्र या पत्रात अर्णब गोस्वामी यांचाही उल्लेख करण्यात आला होता. अलीकडेच ठाकरे सरकारनं या प्रकरणाची चौकशी पुन्हा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज अर्णब गोस्वामींना पकडून कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
माहितीनुसार, वरळी येथील अर्णब गोस्वामी यांच्या राहत्या घरी रायगड पोलिसांसह मुंबई पोलीस अधिकारी दाखल झाले. याठिकाणी पोलिसांनी त्यांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबाने पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. कायद्यानुसार आम्ही कारवाई करत आहोत असं पोलिसांनी सांगितले. तेव्हा अर्णब यांचा मुलगा मोबाईलमध्ये शूट करण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अर्णब यांनी माझ्या मुलाला हात लावू नका असं पोलिसांना बजावलं.
जवळपास १५ मिनिटं पोलीस आणि अर्णब गोस्वामी यांच्या बाचाबाची झाली. पोलिसांनी अर्णब गोस्वामींना हाताला पकडून खेचून नेण्याचा प्रयत्न केला, तसेच महिला पोलीस अधिकाऱ्याने अर्णब यांच्या पत्नीकडून कायदेशीर कागदपत्रावर सही घेण्याचा प्रयत्न केला, पोलीस कारवाईला अर्णब गोस्वामी कुटुंबाने विरोध केल्याचं या व्हिडीओत दिसून आलं.
याबाबत अर्णब गोस्वामींनी पोलिसांवर मारहाणीचा आरोप केला आहे, तसेच माझ्या मुलाला मारलं, मला औषधे घेण्यापासून रोखलं गेले, तसेच कोणत्याही परवानगीशिवाय पोलिसांनी जबरदस्तीने माझ्या घरात प्रवेश केला. पोलिसांनी माझा आणि कुटुंबाचा छळ केला असा आरोप केला, अर्णब यांनी कारवाईला सहकार्य करावं अशी विनंती पोलिसांनी केली, परंतु न ऐकल्याने अखेर पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना खेचत घराबाहेर आणलं आणि पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसवलं.