Video : जिलेटीनच्या कांड्यांचा स्फोट घडवून फोडले ATM, लाखो लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 03:04 PM2021-10-10T15:04:46+5:302021-10-10T15:06:53+5:30
Crime News : अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावात भामट्यांनी एटीएम मशीन फोडून लाखो रुपये लंपास केल्याची घटना पहाटे उघडकीस आली आहे. अज्ञात दरोडेखोरांनी जिलेटीन कांड्यांच्या सहाय्याने स्फोट घडवून एटीएम फोडलं
अहमदनगर - एटीएम मशिनची लूट करुन, किंवा एटीएम मशिन फोडून त्यातील रोकड गायब करण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. मात्र, आता एटीएम मशिन फोडण्यासाठी चक्क जिलेटीनच्या कांड्यांचा वापर करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी हे एटीएम फोडून लाखो रुपयांची रोकडही लंपास केली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी पहाटेच घटनास्थळावर धाव घेतली. (Robbery on ATM machine )
अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावात भामट्यांनी एटीएम मशीन फोडून लाखो रुपये लंपास केल्याची घटना पहाटे उघडकीस आली आहे. अज्ञात दरोडेखोरांनी जिलेटीन कांड्यांच्या सहाय्याने स्फोट घडवून एटीएम फोडलं आहे. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, डिवायएसपी संजय सातव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. तसेच अज्ञात दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहे.
अहमदनगर - एटीएम मशिन फोडून चोरट्यांनी लाखो लुटले pic.twitter.com/cu2wxFB3sg
— Lokmat (@MiLOKMAT) October 10, 2021
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटना अहमदनगर जिल्ह्यातील लोणी खुर्द गावात घडली आहे. लोणी खुर्द गावातील वेताळबाबा चौकात असलेल्या टाटा इंडिकॅशचं एटीएम आहे. दरोडेखोरांनी हे एटीएम जिलेटीन कांड्याच्या सहाय्याने फोडलं आहे. यानंतर दरोडेखोरांनी एटीएममधील 4 लाख 5 हजार रूपयांची रोकड लुटून नेली आहे. हा धक्कादायक प्रकार पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी, पोलिसांकडून तातडीने तपास सुरू असून पथकंही रवाना झाली आहेत.