Video : वाहतूक पोलिसाला बोनेटवरुन फरफटत नेणाऱ्या व्यवसायिकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 09:24 PM2021-10-01T21:24:02+5:302021-10-01T21:24:45+5:30
Traffic Police : तो मिडियाकर्मी असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते. मात्र, त्यात तथ्य नसून तो कपड्याचा व्यवसाय करत असल्याची माहिती आहे.
मुंबई - वाहतूक पोलीस विजयसिंह गुरव (४८) यांना स्वतःच्या कारवरून 'बोनेट ड्राईव्ह' करवणाऱ्या सुहेल कथुरुया (३०) नामक व्यवसायीकाला डी एन नगर पोलिसानी शुक्रवारी अटक केली. अंधेरीतील त्याच्या राहत्या घरातून त्याचा गाशा गुंडाळण्यात आल्याचे पोलिसानी सांगितले. तो मिडियाकर्मी असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते. मात्र, त्यात तथ्य नसून तो कपड्याचा व्यवसाय करत असल्याची माहिती आहे.
वाहतूक पोलिसाला कार चालकाने कारच्या बोनेटवरुन फरफटत नेल्याची घटना मुंबईतील अंधेरीच्या डी. एन. नगर परिसरात घडली. नो एंट्रीत घुसणाऱ्या कारला हा पोलीस थांबवत होता. मात्र गाडी न थांबविल्याने वाहतूक पोलिसाने बोनेटवर उडी मारली. तरी देखील चालकाने कार न खांबवता पोलिसाला पुढे फरफत नेले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पुढे काही स्थानिक लोकांनी ही गाडी थांबवली आणि वाहतूक पोलिसाला बोनेटवरून खाली उतरवले. या प्रकारानंतर कारचालक कार घेऊन पळून गेला. हा प्रकार आज (३० सप्टेंबर) सकाळी ११ वाजण्याच्या सुमाराला घडला. विजय गुरव असे या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. गुरव हे अंधेरी पश्चिमेला आझाद नगर मेट्रो स्टेशनच्याखाली जे पी रोड येथे ड्युटी करत होते. त्यावेळी MH 02 DQ 1314 क्रमांकाची काळ्या रंगाची हुंडाई क्रेटा कार नो एंट्रीत आली.
कार नो एंट्रीत आल्याचे पाहून वाहतूक पोलीस दुरव यांनी ही कार थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तरीही कार चालकाने कार थांबवली नाही. गुरव यांनी कारच्या आडवे येत कार थांबवण्याचा प्रयत्न केला. आपण कारच्या पुढे आहोत हे पाहिल्यावर कार चालक कार थांबवेल असे गुरव यांना वाटले.मात्र कार चालकाने कार न थांबवता तशीच पुढे नेली. शेवटी कारच्या धक्क्याने गुरव कारच्या बोनेटवर सरकले. त्यानंतर चालकाने गुरव यांना फरफटत काही अंतर पुढे नेले. या प्रकरणी आता अंधेरीतील डी एन नगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवला आहे.