पीपीई किटमध्ये बांधलेला मृतदेह जिवंत असल्याचा व्हिडीओ झाला होता व्हायरल; ते आपले वडील असल्याचा एकाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 09:24 PM2021-04-22T21:24:40+5:302021-04-22T21:25:21+5:30
Coronavirus : वडील समजून अंत्यसंस्कार, बांद्रा पोलीस ठाण्यात तक्रार
सदानंद नाईक
उल्हासनगर : पीपीई किट्समध्ये बांधलेला मृतदेह जिवंत असल्याचा व्हिडीओ ३ दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामधील व्यक्ती माझे वडील रामशरण गुप्ता असल्याचा दावा उल्हासनगरमधील निर्मला गुप्ता यांनी केला. तसेच बांद्रा पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दाखल केल्याची माहिती दिली. मात्र, हा व्हिडीओ कधीचा आहे, याबाबत पोलीस माहिती घेत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-४ आयप्पा मंदिर परिसरात राहणाऱ्या निर्मला गुप्ता यांचे वडील रामशरण गुप्ता हे मुंबई चेंबूर परिसरात राहत होते. गेल्या वर्षी २४ जूनला त्यांना निमोनियाचा त्रास झाल्याने, खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. २७ जून रोजी त्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्याने, त्यांना भाभा कोविड रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असताना २९ जून रोजी त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने कुटुंबाला सांगून अंत्यसंस्कारसाठी स्मशानभूमीत बोलाविले. पीपीई किट्समध्ये बांधण्यात आलेल्या मृतदेह बारीक व उंचीने कमी असल्याने, गुप्ता कुटुंबांनी संशय व्यक्त केला. त्यांनी मृतदेहाचा चेहरा दाखविण्याची विनंती केली. मात्र कोविडचे कारण देऊन मृतदेहाचा चेहरा दाखविण्यात आला नाही.
दरम्यान दोन-तीन दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. पीपीई किट्समध्ये बांधलेला मृतदेह जिवंत असल्याचे दाखविण्यात आले. निर्मला गुप्ता यांच्यासह त्यांची आई, भाऊ यांनी व्हिडिओ बघितल्या नंतर पीपीई किट्स मधील जिवंत मृतदेह असलेली व्यक्ती त्यांचा वडीलांचा आहे. असा दावा केला. अंत्यसंस्कार वेळी सोपविण्यात आलेल्या मृतदेहाचा शरीराच्या ठेवणी व बांध्यानुसार मृतदेह वडिलांचा नसल्याचा संशय गुप्ता कुटुंबाने व्यक्त केला होता. व्हायरल झालेल्या व्हिडीओ वरून त्यांनी बुधवारी मुंबई बांद्रा पोलीस ठाण्यात धाव घेऊन व्हिडिओ मधील जिवंत व्यक्त वडील असल्याचे सांगून तशी तक्रार दिली. तसेच तपास करण्याची विनंती पोलिसांना केली. सदर व्हिडीओ कधीचा आहे. याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार असून याप्रकाराने रुग्णालयाचा हलगर्जीपणा उघड झाला आहे.
वडील जिवंत असो....मुलीची आशा
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ या वर्षीचा असेलतर, माझे वडील जिवंत असतील अशी आशा निर्मला गुप्ता यांनी व्यक्त केली. जर जुना असेलतर, रुग्णालयाच्या हलगर्जीपणाचा कळस असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी गुप्ता कुटुंबाने केली.