Video : लेकीसाठी आई चक्क चढली एसपी कार्यालयासमोरील झाडावर अन् केला आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 03:12 PM2020-07-30T15:12:33+5:302020-07-30T15:13:32+5:30
ओढणीने गळफास घेण्याचा प्रयत्न : ३० मिनिटाच्या नाट्यानंतर पोलिसांनीच उतरविले
जळगाव : पती-पत्नीत झालेल्या कौटुंबिक वादातून पती मुलीचा ताबा देत नाही, पोलिसांकडे तगादा लावूनही दखल घेतली जात नाही, त्यामुळे अश्विनी पंकज पाटील (रा.विरवाडे, ता.चोपडा ह.मु.गाढोदा, ता.जळगाव) या विवाहितेने संतापाच्या पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाच्या बाहेरच झाडावर चढून ओढणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी दुपारी दीड ता दोन असे तीस मिनिटे हे नाट्य चालले. पोलिसांनी झाडावर चढवून या विवाहितेला सुखरुप खाली उतरविल्याने सर्वांच्याच जीवात जीव आला. दरम्यान, याआधी देखील अश्विनी हिने झोपेच्या गोळ्या सेवन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी व पंकज यांचा विवाह सोहळा १ फेब्रुवारी २०१७ रोजी विरवाडे येथे झाला आहे. १० ग्रॅम सोन्याची अंगठी, २० भार चांदी व राजाराणी कपाट व इतर भांडी लग्नात दिले होते. काही दिवसानंतर पंकजच्या नोकरीसाठी २ लाख रुपये आणावे म्हणून छळ करण्यात आला. त्यानंतरही वारंवार पैशासाठी छळ करण्यात आला. नातेवाईकांच्या बैठकीत वाद मिटल्यानंतर पंकज पुणे येथे खासगी नोकरीला लागला. दरम्यानच्या काळात अश्विनीने मुलीला जन्म दिला. पुणे येथेही दोन लाखासाठी छळ झाला. ९ जानेवारी २०२० रोजी अश्विनीचे वडील पुण्यात आले असता तेव्हा सासरच्या लोकांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर २ फेब्रुवारी रोजी मुलीला हिसकावून घेत अश्विनीला घराबाहेर हाकलून लावले होते. त्यानंतर अश्विनी माहेरी असताना तिने १८ मे रोजी झोपेच्या गोळ्या सेवन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी दखल घेऊन पती पंकज अशोक पाटील, सासु रेखा अशोक पाटील, सासरे अशोक विश्राम पाटील व जेठ प्रदीप अशोक पाटील (सर्व रा.विरवाडे, ता.चोपडा) यांच्याविरुध्द जळगाव तालुका पोलिसात छळ केल्याचा गुन्हा दाखल केला होता.
जळगाव : पतीच्या ताब्यात असलेल्या मुलाचा ताबा मिळत नसल्याने विवाहितेचा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर झाडावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न
— Lokmat (@MiLOKMAT) July 30, 2020
पोलीस अधीक्षकांनी भेट नाकारली
पतीकडून मुलीचा ताबा मिळावा म्हणून पोलिसांना सांगून थकलो. न्यायालयातही प्रकरण सुरु आहे. आज पोलीस अधीक्षकांना भेटायला आलो, मात्र त्यांनी भेट नाकारली. त्यामुळे संतापाच्या भरात अश्विनी बाहेर आली व कार्यालयाच्या बाहेर आल्यावर झाडावर चढून गळ्यात रुमाल गुंडाळला. जोपर्यंत मुलीचा ताबा मिळणार नाही, तोपर्यंत झाडाच्या खाली उतरणार नाही, असा पवित्रा घेऊन गळ्यात रुमाल बांधून आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. शेजारील शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांनी तातडीने जिल्हा पेठ पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक अकबर पटेल व रामानंद नगरचे निरीक्षक अनिल बडगुजर यांनी आम्ही तुला न्याय मिळवून देतो असे आश्वासन देऊन खाली उतरण्याची विनंती केली, मात्र तरीही अश्विनी ऐकायला तयार नव्हती. शेवटी शहर वाहतूक शाखेचे फिरोज तडवी या कर्मचाºयाने झाडावर चढून अश्विनीला सुखरुप उतरविले. त्यानंतर तिला व तिच्या आई, वडीलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मुंबई पोलिसांकडून सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबावर दबाव; वकीलाने लावला गंभीर आरोप
लोअर परेल येथून २१ लाख किंमतीच्या बनावट एन -९५ मास्कचा साठा जप्त
स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश
...म्हणून बिहार पोलिसांचे पथक मुंबईत धडकल्याने रियाने घेतली सुप्रीम कोर्टात धाव