Video: आधी अश्लील हातवारे केले, मग धडक मारुन फरफटत नेलं; महिलेविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 06:18 PM2023-01-20T18:18:54+5:302023-01-20T18:19:39+5:30
Bangalore Accident: बंगळुरूमधील एका महिलेने एका व्यक्तीला कारच्या बोनेटवर घेऊन एक किलोमीटर फरफटत नेल्याची घटना घडली आहे.
Bangalore Accident: बंगळुरुमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एका महिला कार चालकाने तरुणाला धडक दिली आणि कारच्या बोनेटवर घेऊन फरफटत नेले. हा व्हिडिओ बंगळुरुच्या झानाना भारती नगर भागातील आहे. या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, टाटा नेक्सन आणि मारुती स्विफ्ट या दोन कार एकमेकांना धडकल्या. यानंतर महिला चालकाची आणि त्या व्यक्तीचा वाद झाला. महिला टाटा नेक्सन चालवणाऱ्या महिलेचे नाव प्रियांका आहे, तर त्या व्यक्तीचे नाव दर्शन आहे.
दोन गाड्यांची धडक झाल्यानंतर दर्शन प्रियांकाची गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत होता, पण प्रियांकाने गाडी सुरुच ठेवली. गाडी पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी दर्शनने बोनेटवर उडी मारली. यानंतर प्रियांकाने तशीच गाडी पळवली. दर्शन बोनेटवर लटकत असताना प्रियांकाने जवळपास एक किलोमीटर गाडी चालवली. व्हायरल व्हिडिओमध्ये इतर लोक दुचाकीवरुन प्रियंकाच्या गाडीमागे जातानाही दिसत आहेत. टीव्ही-9 हिंदीने याबाबत वृत्त दिले असून, घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे.
बेंगलुरु में एक महिला ने शख्स को कार के बोनट पर 1 किमी तक घसीटा...#Karnataka#bengalururoad#rashdrivingpic.twitter.com/rojGjyR27g
— Sweta Gupta (@swetaguptag) January 20, 2023
ट्रॅफिक पोलीस उपायुक्त म्हणाले की, 'प्रियांकाने दर्शनच्या गाडीला धडक दिली होती, त्यानंतर दर्शनने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलने दर्शनला अश्लील हातवारे केले आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. दर्शनने तिला कारमधून बाहेर येण्यास सांगितले, पण तिने स्पष्ट नकार दिला आणि गाडी त्याच्या अंगावर चढवली. स्वत:ला वाचवण्यासाठी दर्शनने तिच्या बोनेटवर उडी मारली, त्यानंतरही प्रियांका थांबली नाही आणि जवळपास एक किलोमीटर गाडी चालवत राहिली.
डीसीपी पुढे म्हणाले, 'प्रियांकाने कार थांबवली, त्यानंतर दर्शन आणि त्याच्या मित्रांनी प्रियंकाच्या कारचे काही भाग तोडले. दोन्ही बाजूंकडून एकमेकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंच्या तक्रारींनंतर पोलिसांनी प्रियंकाविरुद्ध कलम 307 अन्वये गुन्हा दाखल केला आहे, तर दर्शन आणि त्याच्या मित्रांविरुद्ध कलम 354 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.