Video : पत्नीची हत्या करून मृतदेह ठेवला घरात लपवून; पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 05:03 PM2019-05-25T17:03:06+5:302019-05-25T17:06:46+5:30
पतीने दोन्ही हाताच्या नसा कापून केला आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई - दारू पिण्यास विरोध करत असल्याने पत्नी वारंवार विरोध करत असल्याने पटीने तिला अमानुष मारहाण करत तिची हत्या केली. धक्कादायक माहिती अशी की, पत्नीची हत्या करून आरोपी पतीने मृतदेह घरीच लपवून घेतला होता. त्यांनतर पतीने दोन्ही हाताच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला आणि रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. काही दिवस उलटून गेल्यानंतर शेजाऱ्यांना दुर्गंधी आल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यावेळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल असून आरोपी पती संजयकुमार भटेल पडीहारी (२९) याला अटक करण्यात आली आहे.
सायन येथील प्रतीक्षा नगर परिसरातील बी/162, तळमजला, रहिवाशी संघ, शास्त्री नगर या ठिकाणी आरोपी संजयकुमार आपल्या पत्नीसह राहत असे. मात्र, पत्नी त्यास दारु पिण्यास विरोध करत असल्याच्या कारणावरुन दोघांचे नोव्हेंबर २०१८ पासून भांडण होते. दरम्यान आरोपी पतीने पत्नीला वेळोवेळी अमानुषपणे मारहाण करुन क्रूर वागणूक देऊन तिचा छळ केला तसेच आजारी असताना औषधे घेत नसल्याच्या कारणावरून अमानुषपणे मारहाण करुन गंभीर दुखापत करुन जीवे ठार मारले. तसेच पत्नीचा मृतदेह घरात लपवून ठेऊन पतीने स्वतःच्या दोन्ही मनगटाच्या नसा ब्लेडच्या सहाय्याने कापून स्वतःला गंभीर दुखापत करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर मृत पत्नी आणि गंभीर जखमी झालेला पती घरात अनेक दिवस असल्याने शेजाऱ्यांना संजयकुमार यांच्या घरातून दुर्गंधी आल्याने त्यांनी पहिले असते पत्नी मृत अवस्थेत तर पती जखमी अवस्थेत रक्तांच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. नंतर पोलिसांना पाचारण केले असता वडाळा टी. टी. पोलिसांनी दोघांना देखील सायन रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात महिलेला मृत घोषित करण्यात आले तर संजयकुमारवर उपचार करण्यात आले. सध्या संजयकुमार २८ मेपर्यंत पोलीस कोठडीत असल्याची माहिती वडाळा टी. टी. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सांगळे यांनी लोकमतशी बोलताना दिली.