Video: जयप्रकाश मुंदडा बँकेच्या अध्यक्षांना निवडीपूर्वीच मारहाण; पुतण्याच्या गटाकडून प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 10:44 PM2023-02-09T22:44:30+5:302023-02-09T22:48:54+5:30
दीपक मुंदडा यांना विचारले असता त्यांनी हाणामारी झालीच नाही. जर झाली असेल तर निवडणूक प्रक्रिया रद्द व्हायला हवी होती, असे म्हटले आहे.
हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील डॉ. जयप्रकाश मुंदडा सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू असताना अध्यक्षपदाचे उमेदवार गोपाल अग्रवाल यांना माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांच्या पुतण्याच्या गटाकडून मारहाणीची घटना दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घडली. याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
या निवडीची प्रक्रिया सुरू असताना अध्याशी अधिकारी सहायक निबंधक मुकुंद देशमुख यांच्यासमोर गोपाल अग्रवाल, राजाभाऊ मुसळे, अंकुश आहेर, भगवान धस, श्याम अग्रवाल आदी मंडळी बसलेली होती. अचानक तेथे या बँकेचे संचालक असलेले दीपक मुंदडा समर्थकांसह आले. समर्थकांनी अग्रवाल यांच्याशी वाद घालून त्यांना मारहाण केली. मुसळे व श्याम अग्रवाल यांनी वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र गोपाल अग्रवाल यांच्यावर ही मंडळी तुटून पडल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे.
याबाबत विचारले असता नवनिर्वाचित अध्यक्ष गोपाल अग्रवाल म्हणाले, दीपक मुंदडा यांना उपाध्यक्ष करण्यास संचालकांचा विरोध होता. त्यामुळे ही प्रक्रिया हाणून पाडण्यासाठी पूर्वनियोजित कट करून त्यांनी हल्ला केला. मी व्यापारी माणूस आहे. भविष्यातही यामुळे माझ्या जीवाला धोका लक्षात घेता कायदेशीर कारवाईचा विचार करीत आहे.
हिंगोली: जयप्रकाश मुंदडा बँकेच्या अध्यक्षांना निवडीपूर्वीच मारहाण#Hingoli#CrimeNews#Politicshttps://t.co/CbvSFUBywhpic.twitter.com/aqmUJtdCtY
— Lokmat (@lokmat) February 9, 2023
याबाबत दीपक मुंदडा यांना विचारले असता त्यांनी हाणामारी झालीच नाही. जर झाली असेल तर निवडणूक प्रक्रिया रद्द व्हायला हवी होती. ठरल्याप्रमाणे मला उपाध्यक्ष केले नाही. त्यामुळे समर्थक नाराज झाले होते, असे सांगितले.