महिलांचे व्हिडीओ काढणाऱ्यास अटक, सिंहगड एक्स्प्रेसमध्ये धक्कादायक प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2023 08:51 AM2023-04-07T08:51:23+5:302023-04-07T08:51:45+5:30

पोक्सो कायद्याअंतर्गत कारवाई, कर्जत पोलिसांकडून तपास सुरू

Video maker of women arrested, action under POCSO Act | महिलांचे व्हिडीओ काढणाऱ्यास अटक, सिंहगड एक्स्प्रेसमध्ये धक्कादायक प्रकार

महिलांचे व्हिडीओ काढणाऱ्यास अटक, सिंहगड एक्स्प्रेसमध्ये धक्कादायक प्रकार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: सिंहगड एक्स्प्रेसमध्ये धक्कादायक प्रकार घडला असून,  महिलांचे व्हिडीओ शूटिंग करून महिलांची छेड काढणाऱ्या मोहम्मद अश्रफ (वय २६, रा. सीतामढी, बिहार)  याला प्रवाशांनी गुरुवारी रंगेहात पकडून चांगलाच धडा शिकविला. त्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याची चौकशी करून त्याच्या मोबाइलवरील व्हिडीओची शहनिशा करून त्याला अटक केली.

मोहम्मदने त्याच गाडीतील महिलांचे बुधवारी व्हिडीओ काढले असल्याचा प्रकार घडला होता. गुरुवारी पुन्हा त्याच एक्स्प्रेसमध्ये व्हिडीओ काढताना प्रवाशांनी त्याला पकडले आणि त्याला चोप देत धडा शिकविला. गाडी कल्याण स्थानकात येताच त्याला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी चौकशी करून एका युवतीच्या तक्रारीवरून त्यास अटक केली आहे.

कर्जत पोलिसांकडून तपास सुरू

पुण्याहून मुंबई येणाऱ्या एक्स्प्रेस गाडीत हा प्रकार घडला. त्याच्यावर पोक्सो कायद्यानुसार आणि लपूनछपून महिलांचे व्हिडीओ काढण्याच्या कायद्यानुसार अटक केली असून, हा प्रकार कर्जत लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने आरोपीस त्या पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकेश ढगे यांनी सांगितले. पुढील तपास कर्जत पोलिस करीत आहे.

 

Web Title: Video maker of women arrested, action under POCSO Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.