Video : Mumbai CST Bridge Collapse : नीरजकुमार देसाईला कोर्टाने सुनावली २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 05:06 PM2019-03-19T17:06:16+5:302019-03-19T17:12:14+5:30
कोर्टाने पोलिसांच्या पुढील तपासासाठी देसाईला २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.
मुंबई - हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी अटक नीरजकुमार देसाईला कोर्टाने २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास देसाईला किल्ला कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी कोर्टाने पोलिसांच्या पुढील तपासासाठी देसाईला २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.
गंजलेले खांब, वरून रंगरंगोटी आणि कमकुवत झालेल्या बांधकामाकडे दुर्लक्ष करून हिमालय पूल चांगल्या स्थितीमध्ये असल्याचा बोगस अहवाल देणे स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाई याला अखेर भोवले. या दुर्घटनेप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी नीरजकुमार देसाईला काल अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. सीएसएमटीला जोडणारा पादचारी पूल गुरुवार १४ मार्च रोजी रात्री ७.२० वाजण्याच्या सुमारास कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला होता, तर ३६ जण जखमी झाले होते. या प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी स्ट्रक्चरल ऑडिटरने निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात हिमालय पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट डी. डी. देसाई असोसिएट कंपनीने गेल्या ऑगस्टमध्ये केले होते. त्या वेळी या कंपनीकडून छोट्या-मोठ्या दुरुस्तीचे काम करण्याचे सुचवून पुलाला सुरक्षित अवस्थेत असल्याचे प्रमाणपत्र दिले होते.