Video : निव्वळ योगायोग! कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा
By पूनम अपराज | Published: November 20, 2018 06:30 PM2018-11-20T18:30:47+5:302018-11-20T18:36:12+5:30
मुंबईतील वर्दळीचे आणि महत्वाच्या अशा सीएसएमटी रेल्वे स्थानकापासून २६/११ या भीषण दहशतवादी हल्ल्याला सुरुवात झाली आणि चक्क १० वर्षांनी ज्यांचा कसाबला पकडून देण्यात महत्वाचा सहभाग आहे त्या बावधनकर यांच्या खांद्यावर सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेची धुरा आहे. हा योगायोगच म्हणावा लागेल.
मुंबई - बघता बघता २६/११ मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला १० वर्ष पूर्ण होत आहेत. २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी १० दहशतवादी समुद्रमार्गे मुंबईत घुसले आणि त्यापैकी कसाब आणि अबू इस्माईल या दोघांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या प्रतीक्षागृहात अंधाधुंद गोळीबार करून अनेक निष्पापांचे जीव घेतले. यानंतर कसाबला रात्री १२. ३० वाजताच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर जिगरबाज पोलिसांनी पकडले. या जिगरबाज पोलीस अधिकऱ्यांपैकी एक हेमंत बावधनकर. मुंबईतील वर्दळीचे आणि महत्वाच्या अशा सीएसएमटी रेल्वे स्थानकापासून २६/११ या भीषण दहशतवादी हल्ल्याला सुरुवात झाली आणि चक्क १० वर्षांनी ज्यांचा कसाबला पकडून देण्यात महत्वाचा सहभाग आहे त्या बावधनकर यांच्या खांद्यावर सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेची धुरा आहे. हा योगायोगच म्हणावा लागेल.
२६ नोव्हेंबर २००८ ला १० दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे मुंबईत घुसून अंदाधुंद गोळीबार केला आणि निष्पापांची कत्तल केली.१६६ निष्पाप नागरिक आणि सुरक्षा रक्षकांची हत्या या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केली. १० वर्षांनंतरही या हल्ल्याच्या भयावह आठवणी आणि जखमा अजून ताज्या आहेत. या हल्ल्यातील एकमेव जिवंत सापडलेला दहशतवादी अजमल आमीर कसाब. या देशद्रोही कसाबला जिवंत पकडून देताना पोलीस कर्मचारी तुकाराम ओंबळे शाहिद झाले. मात्र, गिरगाव चौपाटीवर शाहिद ओंबळे यांच्यासह संजय गोविलकर, भास्कर कदम आणि हेमंत बावधनकर मिळून १६ पोलीस कर्मचारी, अधिकारी यांचे कसाबला जिवंत पकडून देण्यात महत्वाचे योगदान असल्याचं म्हणता येईल.
कसाबने बेछूट गोळीबार करत आणि हॅण्ड ग्रेनेड फेकून २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला सुरुवात सीएसएमटी रेल्वे स्थानकापासून झाली आणि या स्थानकात जवळपास ५८ लोकांना आपला जीव गमवावा लागला. तसेच सीएसएमटी रेल्वे पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी शशांक शिंदे यांना देखील या हल्ल्यात शाहिद व्हावं लागलं. आता त्याच मुंबईतील महत्वाच्या आणि संवेदनशील अशा रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेची जबाबदारी हेमंत बावधनकर मोठ्या जिकरीने सांभाळत आहेत. २६/११ मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला १० वर्ष पूर्ण होत असली तरी त्या थरकाप उठवून देणाऱ्या कटू आठवणी मात्र कायम आहेत. दहशतवाद्यांनी सर्वप्रथम टार्गेट केलेल्या सीएसएमटी रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेची जबाबदारी पेलताना बावधनकर अतिशय दक्ष असतात. २६/११ हल्ल्यानंतर महत्वाची रेल्वे स्थानक म्हणजेच मुंबई सेंट्रल, सीएसएमटी सारखी रेल्वे स्थानकं उडवून देणाऱ्या कॉल्सने काही महिन्यांपूर्वी पोलिसांची झोप उडवली होती. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे या कट उधळून लावण्यात पोलिसांना यश आलं आहे.