Video - धक्कादायक! फक्त 9 रुपयांवरून झालेला वाद टोकाला गेला; चहाच्या दुकानाची तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 01:31 PM2024-03-07T13:31:45+5:302024-03-07T13:33:08+5:30
काही मुलं चहाच्या दुकानाची तोडफोड करत आहेत. व्यक्तीने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
हरियाणाच्या गुरुग्राममधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. जिथे काही मुलं चहाच्या दुकानाची तोडफोड करत आहेत. व्यक्तीने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुलांनी हे फक्त 9 रुपयांसाठी केल्याचं सांगण्यात येत आहे. ही घटना दोन मार्च रोजी घडल्याचं सांगण्यात येत आहे.
जुनी दिल्ली रोड येथील सेक्टर 18 येथील पंढरपुरी चहाच्या दुकानात ही घटना घडली. महाराष्ट्रातील प्रसिद्ध चहा पंढरपुरी या नावाने मारुती सुझुकीच्या गेट क्रमांक 1 समोर दुकान आहे. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हल्ला झाला त्यावेळी दुकानात फक्त साहिल तिवारी नावाचा कर्मचारी होता.
#हरियाणा के गुरुग्राम में चाय के 9 रुपए के पीछे कुछ युवकों ने पूरी दुकान तोड़ डाली। मारपीट की यह वारदात सेक्टर 18 ओल्ड दिल्ली रोड स्थित पंढरपुरी चाय की दुकान पर हुई। यह दुकान मारुति सुजुकी के गेट नंबर 1 के सामने महाराष्ट्र की फेमस चाय पंढरपुरी के नाम से है। मारपीट की घटना… pic.twitter.com/HqD4fpPgn7
— JITENDER MONGA (@JITENDERMONGA_) March 6, 2024
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये चार-पाच मुलं दुकानात घुसल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. ते सामान खाली पाडत मोठ्या प्रमाणात तोडफोड करतात. दुकानदाराला मारहाण करतात. साहिलने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 2 मार्च रोजी रात्री 8 वाजता काही लोक चहा पिण्यासाठी दुकानात आले होते. साहिलने 15 रुपयांचा एक चहा दिला, मात्र आरोपीने चहासाठी 12 रुपये देण्यास सुरुवात केली. यावरून वाद झाला आणि त्यांनी संपूर्ण दुकानाची तोडफोड केली.
या संपूर्ण प्रकरणाची तक्रार पालम विहार पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोर अद्याप पसार आहेत. सोशल मीडियावर काय व्हायरल होत आहे, याची माहिती मुख्यमंत्र्यांनी मागवली आहे. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.