Video: कर्जत-कल्याण मार्गावर रिक्षा अन् कारमध्ये भीषण अपघात; CNG टाकीचा स्फोट, तिघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 01:30 PM2021-03-30T13:30:39+5:302021-03-30T13:31:10+5:30
कर्जत कल्याण राज्यमार्गावर डिकसळ मधील सिद्धिविनायक हॉस्पिटल समोर आज दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला.
कर्जत - कर्जत कल्याण राज्यमार्गावर मंगळवारी दुपारच्या सुमारास रिक्षा आणि कारमध्ये धडक होऊन भीषण असा अपघात झाला. या अपघातात रिक्षामधील तिघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल घेरडीकर आणि कर्जत पोलीस निरीक्षक अरुण भोर यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून अधिक तपास सुरु केला आहे.
कर्जत कल्याण राज्यमार्गावर डिकसळ मधील सिद्धिविनायक हॉस्पिटल समोर आज दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला. नेरळकडून कर्जतकडे जाणाऱ्या रिक्षा क्रमांक एमएच 05 सीजी 4351 ला मागून येणाऱ्या कार क्रमांक एमएच 01 सीजे 2948 ने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की त्यात दोन्ही गाड्यांना क्षणार्धात आग लागली. स्थानिकांनी या अपघाताची पोलीस व कर्जत अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यामुळे सर्व यंत्रणा अपघाताच्या स्थळी दाखल झाल्या मात्र तोवर दोन्ही गाड्या आगीत भस्मासात झाल्या होत्या.
कर्जत-कल्याण मार्गावर रिक्षा आणि कारचा भीषण अपघात, ३ जण जागीच ठार, CNG टाकीचा स्फोट झाल्याने गाड्यांना लागली आग #Accidentpic.twitter.com/O2tbgT1Woi
— Lokmat (@MiLOKMAT) March 30, 2021
यामध्ये रिक्षातील सरिता मोहन साळुंके, रा. नेरळ, सुभाष जाधव व शुभांगी सुभाष जाधव रा. बदलापूर यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने कर्जत तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी डीवायएसपी अनिल घेरडीकर आणि कर्जत पोलीस निरीक्षक अरुण भोर यांनी पाहणी करून अधिक तपास करत आहेत .
दरम्यान, कर्जत कल्याण राज्यमार्गावर ठेकेदाराने कामे अर्धवट केल्याने मागील काही दिवसात हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर रस्ता दुभाजक व स्पीडब्रेकर यांची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे मात्र बांधकाम विभाग उदासीन भूमिका घेत आहे. त्यामुळे या मार्गावर आणखी किती बळी जाणार अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.