Video - 32 मिनिटांत 20 कोटींचा दरोडा; रिलायन्स ज्वेलरी शोरूममध्ये धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 09:05 AM2023-11-10T09:05:15+5:302023-11-10T09:06:36+5:30
अवघ्या 32 मिनिटांत दरोडेखोरांनी रिलायन्स ज्वेलरी शोरूम फोडून 20 कोटींचे दागिन्यांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
उत्तराखंडमधील डेहराडूनमध्ये अवघ्या 32 मिनिटांत दरोडेखोरांनी रिलायन्स ज्वेलरी शोरूम फोडून 20 कोटींचे दागिन्यांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शोरूममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घाबरवण्यासाठी चोरांनी काहींना बंदुकीचा धाक दाखवला आणि काहींना बेदम मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चार जण शोरूममध्ये घुसले आणि त्यांचे काही साथीदार बाहेर उभे होते. राजपूर रोडवर असलेल्या रिलायन्स ज्वेलरी शोरूममध्ये दरोड्याची ही घटना घडली. शोरूम सकाळी 10.15 वाजता उघडलं होतं. शोरूमचे 11 कर्मचारी ग्राहक येण्यापूर्वीच दागिन्यांची व्यवस्था करत होते. डिस्प्ले बोर्डमध्ये 20 कोटींहून अधिक किमतीचे हिरे आणि सोन्याचे दागिने होते.
#WATCH | Uttarakhand | CCTV footage of a robbery worth crores from Reliance Jewelers on Rajpur Road, Dehradun (09.11)
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 10, 2023
SP City Dehradun Sarita Doval said that an investigation into the clues found from CCTV footage is underway.
(CCTV visuals confirmed by police) pic.twitter.com/78bSul6Upr
सकाळी 10.24 वाजता मास्क घातलेले चार जण शोरूममध्ये घुसले. त्यांनी आधी सुरक्षा रक्षक हयात सिंहला आत ओढले. यानंतर शोरूममधील संपूर्ण कर्मचार्यांना बंदुकीच्या धाकावर ओलीस ठेवून सर्वांचे मोबाईल जप्त करण्यात आले. काही कर्मचाऱ्यांनी विरोध केला असता हल्लेखोरांनी त्यांना मारहाण केली. दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांचे हात प्लास्टिकच्या बँडने बांधले आणि शोरूमच्या पॅन्ट्री रूममध्ये सर्वांना कोंडलं.
काही महिला कर्मचाऱ्यांना धमकावून डिस्प्ले बोर्डवर लावलेले दागिने काढून बॅगमध्ये टाकण्यास भाग पाडले. यानंतर त्यांनी तीन महिला कर्मचाऱ्यांना किचनमध्ये कोंडलं. दरोडेखोरांनी अर्धा तास शोरूममध्ये लूटमार सुरू ठेवली होती पण कोणालाही याची कल्पना आली नाही. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हाच आसपासच्या लोकांना दरोड्याची घटना घडल्याचं समजलं. मात्र दरोडेखोर पळून जात असताना जवळच लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ते कैद झाले.