Video : शाब्बास ठाणे पोलीस! चोरीस गेलेले, गहाळ झालेले मोबाईल नागरिकांना मिळाले परत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 07:19 PM2018-12-03T19:19:08+5:302018-12-03T19:21:08+5:30
ठाणे पोलिसांनी नागरिकांचा विश्वास जिंकून त्यांना शाश्वती नसलेली गोष्ट साध्य करून दाखवली असल्याचे ठाण्याच्या परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डॉ .डी .एस स्वामी यांनी सांगितले.
ठाणे - मोबाईल चोरीच्या, गहाळ होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. एकदा चोरीला गेलेला मोबाईल परत मिळणं याची शक्यता देखील कमी असल्याने नागरिक याबाबत पोलिसात तक्रार द्यायला सुद्धा जात नाही. मात्र, ठाणे पोलिसांनी ३५० हून अधिक मोबाईल शोधून ठाणेकरांना मोबाईल चोरी अथवा गहाळ झाल्यास तक्रार देण्यासाठी पुढे या संदेश दिला आहे. नागरिकांना आपला मोबाईल हरवला अथवा चोरीस गेल्यास तो पुन्हा मिळेल याची शाश्वती फारच कमी असते. मात्र, ठाणे पोलिसांनी नागरिकांचा विश्वास जिंकून त्यांना शाश्वती नसलेली गोष्ट साध्य करून दाखवली असल्याचे ठाण्याच्या परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डॉ .डी .एस स्वामी यांनी सांगितले.
ठाण्यातील नागरिकांच्या चोरीला गेलेल्या आणि गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी पोलीस उपायुक्त डॉ स्वामी यांनी विशेष पथकाची स्थापना केली. या पथकाने ठाण्यामधे हरवलेल्या मोबाईलचा तांत्रिकदृष्ट्या शोध घेतला व 5,10,000/- किंमतीचे एकूण 51 मोबाईल हस्तगत केले. तसेच ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालेकर व उपनिरीक्षक बाबर व त्यांच्या पथकाने आठ मोबाईल हस्तगत केले. यात मोबाईल चोरलेल्या सहा आरोपींना अटक करून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
डॉ. स्वामी यांच्या पथकाने या नऊ महिन्यात एकूण 37,98,750/- किंमतीचे 351 मोबाईलचा शोध घेतला आहे आणि आतापर्यंत चोरीच्या 33 गुन्ह्यातील 35 मोबाईल हस्तगत केले आहेत. 20 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता जे ५१ मोबाईल हस्तगत केले होते ते न्यायालयाच्या परवानगीने नागरिकांना आज परत करण्यात आले. त्यावेळी जमलेल्या नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले.