Video : शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, शिवीगाळ केल्याने महिला शिवसैनिकाने शहर प्रमुखास चोपले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 08:34 PM2022-04-17T20:34:38+5:302022-04-17T20:38:37+5:30
female Shiv Sainiks beaten shahar pramukh : एकमेकांच्या विरुद्ध दाखल केले गुन्हे
मीरारोड - भाईंदर शिवसेनेमधील असलेला अतंर्गत वादंग रविवारी शिवसेना शाखेतच उफाळून आला. घाणेरड्या शिव्या दिल्यावरून महिला शिवसैनिकाने शहर प्रमुखास मारले व काळे फासले. त्यात शहर प्रमुखाचे कपडे फाटले. तर त्या झटापटीत ती महिला शिवसैनिक देखील जखमी झाली आहे. या प्रकरणी दोघांनी एकमेकांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
भाईंदर पोलीस ठाण्यासमोरच शिवसेनेची शाखा आहे. आज रविवारी दुपारी माजी शहर संघटक वेदाली परळकर ह्या महिला बचत गटाबबत काही महिलांना घेऊन शाखेत गेल्या होत्या. त्यावेळी शहरप्रमुख पप्पू भिसे हे खुर्चीवरून उठून बाहेर गेले असता वेदाली ह्या त्या खुर्चीवर जाऊन बसल्या. भिसे यांनी ते पाहिले व खुर्चीत बसण्यावरून वेदाली यांना शिवीगाळ सुरु केली. घाणेरड्या शिव्या दिल्या म्हणून भिसे यांना जाब विचारला व त्यावरून भांडण थेट हातघाईवर आले. शाखेच्या बाहेर देखील वेदाली व अन्य काही महिलांनी भिसे यांना मारायला सुरवात केली. तसेच काळे फसले तर या दरम्यान वेदाली यांच्या हातावर देखील जखमा झाल्या. त्या जखमा ओरबाडल्याच्या की कोणत्यातरी धारदार वस्तूमुळे झाल्या हे स्पष्ट झालेले नाही . भाईंदर येथील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
भर बाजारातच हा शिवसेनेचा राडा झाल्याने एकच गर्दी झाली होती. दरम्यान वेदाली यांच्या फिर्यादीवरून भाईंदर पोलिसांनी भिसे यांच्यावर विनयभंगासह मारहाण व जखमी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे भिसे यांनी देखील वेदाली सह अन्य ६ ते ७ महिलांवर एकत्र मिळून मारल्याची फिर्याद दिल्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भिसे यांनी काहीजणांचा पक्ष प्रवेश कार्यक्रम आमदार प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयात शनिवारी केला होता. त्यावेळी महिला पदाधिकारीना बोलावले नाही म्हणून राग येऊन आपल्यावर हल्ला घडवून आणण्यात आल्याचे कारण भिसे यांनी सांगितले.
शिवसेनेतील ह्या राड्या नंतर विरोधीपक्ष नेते धनेश पाटील, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, जिल्हा संघटक स्नेहल सावंत, उपजिल्हा प्रमुख शंकर वीरकर, नगरसेवक राजू भोईर, विक्रमप्रताप सिंह सह अनेक पदाधिकारी व शिवसैनिकांनी पोलीस ठाणे परिसरात गर्दी केली होती. पोलीस ठाण्याबाहेर देखील शिवसेनेच्या दोन गटात तणावाचे वातावरण होते. मध्येच वादविवाद होत होते. पोलिसांनी त्यांना तंबी दिली तसेच तेथून हुसकावून लावले.
शिवीगाळ केल्याने भाईंदरमध्ये महिला शिवसैनिकाने शहर प्रमुखास चोपले pic.twitter.com/2cdO1VXcbi
— Lokmat (@lokmat) April 17, 2022
सेनेतील अंतर्गत वादातून अखेर राडा
भिसे यांना शहर प्रमुख केले भिसे यांना शहर प्रमुख केले त्यावरून सेनेत काहीजणांनी नाराजी व्यक्त केली होती. तर माजी नगरसेविका शुभांगी कोटियन यांना उत्तन विभागात नेमले असता वेदाली यांना भाईंदर शहर संघटक म्हणून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन नेमण्यात आले होते. वेदाली यांच्या नियुक्तीमुळे भिसे व समर्थक नाराज होते व त्यांना पदाधिकारी मानत नव्हते. आ. सरनाईकांकडे तश्या तक्रारी केल्या होत्या. सदर शाखेत भिसे व वेदाली यांच्यात अनेकवेळा वादाच्या ठिणग्या पडत होत्या. वेदाली यांनी शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार देखील केली होती. दुसरीकडे सरनाईक यांनी देखील संपर्क प्रमुख या नात्याने त्यांना विचारात न घेता केलेल्या वेदाली आदींच्या नियुक्त्या वरून रद्द करायला लावल्या . त्यावेळी देखील सेनेतील दोन गटाचे वाद चव्हाट्यावर आले होते.
शाखेवर वर्चस्व ?
पोलीस ठाण्यासमोरील शाखा आणि स्कायवॉक खालील शाखेच्या बाहेर बाकडे - स्टॉल लावण्यात आल्याने त्याचे भाडे व वीज पुरवठा वरून टीका होत होती. भाईंदर पोलीस ठाण्याचे समोरील शाखेत स्वतःचे वर्चस्व राहावे यासाठी देखील अंतर्गत रस्सीखेच तसेच सदर शाखेच्या माध्यमातून अर्थपूर्ण उद्दिष्ट साध्य करण्याची कारणे देखील राड्या मागे असल्याची चर्चा आहे.