विमानतळाजवळील इमारतीत घुसून नरेंद्र मोदींचे व्हिडिओ शूटिंग, दोघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 08:19 AM2024-04-04T08:19:57+5:302024-04-04T08:20:12+5:30
दोघे एका मराठी वृत्तवाहिनीचे पत्रकार आणि व्हिडिओ जर्नालिस्ट असल्याचे त्यांनी तक्रारदाराला सांगितले असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
- गौरी टेंबकर
मुंबई: उपनगरातील विलेपार्ले (पूर्व) येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या देशांतर्गत टर्मिनलजवळ असलेल्या एसआरए इमारतीत बळजबरी घुसून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिज्युअल शूट करणाऱ्या दोघांवर विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ते दोघे एका मराठी वृत्तवाहिनीचे पत्रकार आणि व्हिडिओ जर्नालिस्ट असल्याचे त्यांनी तक्रारदाराला सांगितले असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
विलेपार्ले पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार महेश पटेल (६१) या पायावाडी एसआरए इमारतीत ११ व्या मजल्यावर राहणाऱ्या रिक्षाचालकाने या प्रकरणी तक्रार दिली आहे. पटेल यांच्या म्हणण्यानुसार, १ एप्रिल रोजी सकाळी १०.१५ वाजता दोन अनोळखी इसम त्यांच्या घरामध्ये अचानक एक कॅमेरा आणि एक स्टॅन्ड घेऊन आले. पटेल यांनी त्यांची ओळख विचारल्यावर आम्ही एका मराठी चॅनलचे मीडियावाले आहोत, मोदी साहेब डोमेस्टिक एअरपोर्ट येथे आले आहेत, आम्ही मोदी साहेबांचे व्हिडिओ शूटिंग घ्यायला आलो आहोत असे त्यांनी पटेलना सांगितले.
तुमच्याकडे याची परमिशन आहे का अशी विचारणा पटेल यांनी केल्यावर आम्ही बिल्डिंगचे सेक्रेटरी आणि सुरक्षारक्षकाची परमिशन घेतली आहे असे उत्तर त्यांनी दिले. पटेल यांच्या तक्रारीनुसार सदर दोघे त्यांना धक्का मारून त्यांच्या घरात शिरले. पटेल यांच्या खिडकीतून डोमेस्टिक एअरपोर्टमधील विमान तसेच व्हीआयपी आल्याचे दृश्य स्पष्टपणे दिसते. त्यानुसार सदर दोन व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानाच्या व्हिडिओ शूटिंगसाठी डोमेस्टिक एअरपोर्टच्या दिशेला कॅमेरा अँगल सेट केला. इतकेच नव्हे तर मोदी विमानातून उतरल्यानंतर तेही व्हिडिओ शूटिंग त्यांनी केले. जवळपास १५ मिनिटे शूट केल्यानंतर ते निघून गेले. जाताना त्यांनी पटेल यांना त्यांची नावे आणि मोबाईल नंबर देखील दिला.
त्यांनतर ३ एप्रिल रोजी पटेल यांच्या सोसायटी गेट जवळ साध्या वेषातील काही पोलीस आले जे पायावाडी बिल्डिंगमधून कोणाच्या घरातून एअरपोर्टचे व्हिडिओ शूटिंग केले गेले आहे का अशी विचारणा त्यांनी केली. तेव्हा पटेल यांनी घडला प्रकार पोलिसांना सांगितला आणि विलेपार्ले पोलिसात धाव घेतली. त्यांनी वृत्तवाहिनीचा पत्रकार आणि त्याच्या कॅमेरामन विरोधात तक्रार दिल्यावर दोन अनोळखी व्यक्तीवर भारतीय दंड संहिता कलम १८८, ३२३, ३४ आणि ४४८ या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे. पोलिसांनी सुरक्षारक्षकालाही पायावाडी इमारतीमध्ये अनोळखी व्यक्तींना प्रवेश देऊ नये असे सक्त आदेश दिले आहेत.