Video : चंद्रपूरात थरार! बल्लारपुरातील सूरज बहुरिया हत्याकांडातील आराेपीवर बुरखाधारी व्यक्तीने केला गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 09:45 PM2021-07-12T21:45:28+5:302021-07-12T21:48:03+5:30
Firing Case : भरदुपारी २.४५ वाजताच्या सुमारास चंद्रपुरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या रघुवंशी काॅम्प्लेक्सच्या आवारात अचानक घडलेल्या या थरारक घटनेने चंद्रपूरकरही चांगलेच हादरले.
चंद्रपूर : बल्लारपुरात घडलेल्या सूरज बहुरिया हत्याकांडातील आरोपीवर सोमवारी चंद्रपुरात गोळीबार झाला. एका बुरखाधारी व्यक्तीने पिस्तुलातून तब्बल चार गोळ्या झाडल्या. यातील तीन गोळ्या लागल्या. दोन गोळ्या पाठीवर, तर एक हाताला लागली. यानंतर आरोपी एका दुचाकीवरून फरार झाला. आकाश आंदेवार (वय ३२, रा. बल्लारपूर) असे जखमीचे नाव आहे. जखमीला चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राथमिक उपचार करून नागपूरला हलविले. भरदुपारी २.४५ वाजताच्या सुमारास चंद्रपुरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या रघुवंशी काॅम्प्लेक्सच्या आवारात अचानक घडलेल्या या थरारक घटनेने चंद्रपूरकरही चांगलेच हादरले.
८ ऑगस्ट २०२० रोजी दारू व्यवसायातील वर्चस्वातून बल्लारपूर येथे सूरज बहुरिया याची दोनजणांनी गोळ्या झाडून भर चौकात हत्या केली होती. या हत्याकांडामध्ये अमन आंदेवर व आकाश आंदेवार या सख्ख्या भावांना बल्लारपूर पोलिसांनी अटक केली होती. तीन महिन्यांपूर्वी आकाशची कारागृहातून सुटका झाली. तेव्हापासून सूरज बहुरियाचे समर्थक आकाशच्या मागावर असल्याचे समजते. यातूनच आकाशवर हनी ट्रॅप रचून चंद्रपुरात त्याला संपविण्याचा कट रचला होता, अशी माहिती पोलीस सूत्राने दिली. सोशल मीडियावर मुलीच्या नावाने फेक अकाउंटच्या माध्यमातून आकाशला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. आकाशही त्यात अलगद फसला. या माध्यमातूनच सोमवारी त्याला भेटण्यासाठी चंद्रपुरात बोलाविले. आकाश भेटायला आला. भेटायला मुलगी आली नाही, तर एक पुरुष बुरखा घालून आला. दोघांची भेट झाली तेव्हा ही बाब आकाशच्या लक्षात येताच तो तेथून पळत सुटला. क्षणही वाया न दवडता त्या बुरखाधारी आरोपीने आकाशच्या दिशेने सिनेस्टाईल पिस्तूल रोखून पाठलाग करतानाच चार गोळ्या झाडल्या. यातील तीन गोळ्या आकाशला लागल्या. दोन पाठीवर व एक गोळी त्याच्या हाताला लागल्याने तो जखमी झाला.
चंद्रपूर शहरातील मध्यवर्ती भागातील रघुवंशी कॉम्प्लेक्स परिसरात मुलीच्या वेशात आलेल्या इसमाने एका व्यक्तीवर बंदुकीतून तीन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात एकजण जखमी pic.twitter.com/XUwsD5m5kn
— Lokmat (@MiLOKMAT) July 12, 2021
पिस्तुलातून गोळ्या झाडण्याचा आवाज येताच रघुवंशी काॅम्प्लेक्समध्ये व परिसरात जमलेल्या लोकांची एकच पळापळ सुरू झाली. जखमी आकाशने धनराज प्लाझामधील एका मोबाईलच्या दुकानात आश्रय घेतला. ही संधी साधून बुरखाधारी आरोपी एका स्कुटीने घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती होताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे, पोलीस उपनिरीक्षक नीलेश वाघमारे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. काही वेळातच पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत तपास सुरूच होता. पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नव्हता. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस तैनात केले आहेत.
हत्येचा कट व हनी ट्रॅप
सूरज बहुरिया हत्याकांडानंतर बल्लारपुरात पुन्हा गँगवारला सुरुवात झाली आहे. बहुरिया हत्याकांडातील आरोपीच्या मागावर बहुरिया समर्थक असल्याची चर्चा ऐकायला येत होती. पोलीस सूत्रानुसार, आकाश कारागृहातून सुटून आल्यापासून त्याचा काटा काढण्याचा कट रचला जात आहे. यासाठी सोशल मीडियावर मुलीच्या नावाने फेक अकाउंट बनविण्यात आले. यामध्ये आकाशवर हनी ट्रॅप लावण्यात आला. यातून त्याला बोलावून संपविण्याचा डाव होता. मात्र, यातून आकाश बालंबाल बचावला.
घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
रघुवंशी काॅम्प्लेक्सच्या आवारात अनेक सीसीटीव्ही कॅमरे लावलेले आहेत. एका कॅमेऱ्यात बुरखाधारी आरोपी हातात पिस्तूल घेऊन आकाश आंदेवारच्या मागे धावताना गोळ्या झाडत असल्याचे कैद झाले आहे. हा व्हिडिओ शहरात झपाट्याने व्हायरल झाला.
लहान मुलगा बचावला
बुरखाधारी आरोपी आकाश गंदेवार याच्या मागे हातात पिस्तूल घेऊन गोळ्या झाडत धावत असताना एक लहान मुलगा त्याला आडवा आल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. सुदैवाने त्याला गोळी लागली नाही.