भाजपा नेत्याने पत्नी आणि 2 मुलांसह घेतलं विष; चौघांचा मृत्यू, धक्कादायक कारण आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 11:50 AM2023-01-27T11:50:58+5:302023-01-27T11:53:58+5:30
संजीव मिश्रा हे भाजपा विदिशा नगर मंडळाचे उपाध्यक्ष होते.
मध्य प्रदेशातील विदिशा येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे भाजपाच्या एका नेत्याने पत्नी आणि दोन मुलांसह विष घेतलं आहे. यामुळे कुटुंबातील चारही जणांचा मृत्यू झाला आहे. विदिशातील या भाजपा नेत्याचे नाव संजीव मिश्रा आहे. आपल्या दोन मुलांच्या आजाराने ते हैराण झाले होते. याच कारणावरून त्यांनी पत्नी व दोन मुलांसह विष घेतलं. यानंतर संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
भाजपाचे विदिशा मंडल प्रमुख सुरेंद्र सिंह चौहान यांनी सांगितले की, विदिशाच्या बंटी नगर भागात राहणारे संजीव मिश्रा हे भाजपा विदिशा नगर मंडळाचे उपाध्यक्ष होते. ते भाजपाचे माजी नगरसेवकही होते. गुरुवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास संजीव मिश्रा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, देवाने शत्रूच्या मुलांना हा ड्यूशेन मस्क्युलर डिस्ट्रॉफी (डीएमडी) आजार देऊ नये.
हा प्रकार पाहिल्यानंतर संजीव मिश्रा यांच्या ओळखीचे लोक त्यांच्या घरी पोहोचले असता त्यांना 45 वर्षीय संजीव, त्यांची पत्नी नीलम मिश्रा आणि दोन मुले अनमोल आणि सार्थक बेशुद्धावस्थेत आढळले. यानंतर सर्वांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे कुटुंबातील चारही सदस्यांचा मृत्यू झाला.
विदिशाचे डीएम उमाशंकर भार्गव म्हणाले की, संजीव मिश्रा यांच्या दोन्ही मुलांना डीएमडी नावाचा अनुवांशिक आजार आहे, त्यावर कोणताही इलाज नाही. घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडल्याचेही त्यांनी सांगितले. ज्यात संजीव मिश्रा यांनी लिहिले आहे की, ते आपल्या मुलांना वाचवू शकत नाही, त्यामुळे त्याला आता जगायचे नाही. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"