नोटांची बंडलं, सोनं-चांदी अन् बरंच काही; इंजिनीयर कुबेर निघाले, संपत्ती मोजून अधिकारी दमले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 03:52 PM2021-12-18T15:52:40+5:302021-12-18T15:53:03+5:30
कार्यकारी अभियंत्याच्या घरावर दक्षता विभागाचा छापा; संपत्ती पाहून अधिकाऱ्यांचे डोळे विस्फारले
पाटणा: उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याप्रकरणी बिहारमध्ये सरकारी अधिकाऱ्यांवर छापे टाकले जात आहेत. दक्षता विभागानं ग्रामीण कार्य विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सिंह यांच्याशी संबंधित मालमत्तांवर धाडी टाकल्या. अभियंत्याच्या घरातून लाखो रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. घरात सापडलेली नोटांची बंडलं पाहून अधिकाऱ्यांना धक्का बसला. याशिवाय सोने-चांदीचे दागिनेदेखील सापडले.
अभियंत्याच्या घरात छापेमारी दरम्यान जवळपास ५० ते ६० लाखांची रोकड आढळून आली. यासोबतच ३ किलो चांदी आणि अर्धा किलो सोनंदेखील सापडलं. जमिनीची कागदपत्रं आणि बँकांची पासबुकदेखील दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागली. अजय कुमार सिंह यांच्याविरोधातील कारवाई सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अजय कुमार सिंह मसौढीमध्ये ग्रामीण कार्य विभागात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहेत. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळेच दक्षता विभागानं त्यांच्या मालमत्तांवर छापे टाकले. छाप्यावेळी सापडलेल्या संपूर्ण संपत्तीची माहिती कारवाई पूर्ण झाल्यावर देण्यात येईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्याआधी एक दिवसापूर्वीच समस्तीपूरच्या उपनिबंधकांच्या घरावर दक्षता विभागानं धाडी टाकली.
उपनिबंधक निघाले कुबेर
शुक्रवारी दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी समस्तीपूरचे उपनिबंधक मनी रंजन यांच्या घरांवर छापा टाकले. रंजन यांच्याशी संबंधित ३ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. या दरम्यान मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली. उपनिबंधकानं जमा केलेली माया पाहून छापा टाकायला गेलेल्या अधिकाऱ्यांचे डोळे विस्फारले.
समस्तीपूरचे उपनिबंधक मणी रंजन यांच्या घरांवर विशेष दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले. अवैधपणे उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती गोळा केल्याचा आरोप रंजन यांच्यावर होता. अधिकाऱ्यांनी कारवाईत एकूण १.६२ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकाचवेळी पाटणा, मुझफ्फरपूर आणि समस्तीपूरमध्ये छापे टाकले. अवैध कमाई केल्याचा आरोप खरा असल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं.