हत्येच्या एक दिवस आधी केलेली मारहाण विजयच्या जिवावर बेतली, पूर्वीचा वाद कारणीभूत असल्याचा पोलिसांचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 11:38 AM2021-05-15T11:38:04+5:302021-05-15T11:40:05+5:30

विजय नवलगिरे याचा ११ महिन्यांपूर्वी अंबरनाथ पश्चिम भागातील बालाजीनगर परिसरातील दर्शना नावाच्या मुलीसोबत प्रेमविवाह झाला होता.

Vijay murder case police suspect earlier dispute | हत्येच्या एक दिवस आधी केलेली मारहाण विजयच्या जिवावर बेतली, पूर्वीचा वाद कारणीभूत असल्याचा पोलिसांचा अंदाज

हत्येच्या एक दिवस आधी केलेली मारहाण विजयच्या जिवावर बेतली, पूर्वीचा वाद कारणीभूत असल्याचा पोलिसांचा अंदाज

Next


अंबरनाथ: अंबरनाथ बी केबिन रोड परिसरात भरदिवसा विजय नवलगिरे या तरुणाची हत्या गुरुवारी त्याच्या पत्नीसमोरच करण्यात आली. नेमका हा प्रकार का घडला? याचा पोलीस शोध घेत आहेत. त्यातच पोलिसांच्या तपासात एक बाब समोर आली आहे की हत्येच्या एक दिवस आधी विजयने आरोपीसोबत भांडण करून त्याला मारहाण केल्यामुळे वाद वाढला होता. याच वादातून आरोपीने ही हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

विजय नवलगिरे याचा ११ महिन्यांपूर्वी अंबरनाथ पश्चिम भागातील बालाजीनगर परिसरातील दर्शना नावाच्या मुलीसोबत प्रेमविवाह झाला होता. विजय आणि याच परिसरात राहणाऱ्या आरोपींचे पूर्वीपासून वाद असल्याने त्यांच्या मनात या प्रेमविवाहामुळे आणखी संताप वाढला होता. त्यातच गेल्या वर्षी रामू कोली याचे ताडीचे दुकान विजयने बंद पाडले होते. त्याचादेखील राग आरोपींच्या मनात होता. हे सर्व सुरू असतानाच १२ मे रोजी विजय आणि आरोपी जगदीश उर्फ जग्गू मुंगर यांच्यात वादावादी होऊन मारहाण झाली होती. याच मारहाणीचा बदला घेण्यासाठी आरोपींनी थेट विजय याचे घर गाठले. घराचे दार बंद असताना त्यांनी लाथा मारून दरवाजा तोडला. घरात जाताच विजयच्या डोळ्यावर स्प्रे मारून त्याला ओढत इमारतीखाली आणले. यादरम्यान विजयची पत्नी वाचविण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र, आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्यांनी मिळेल त्या वस्तूने विजयवर हल्ला केला. एवढेच नव्हेतर, त्याला फरफटत नेत त्याच्या डोक्यावर दगड टाकला.

आदल्या दिवशी झालेल्या भांडणाचा राग काढण्यासाठी हे सर्व आरोपी एकत्रित आले होते. आरोपी कालिदास कोली, जग्गू मुंगर, सोनू स्वामी, रामू कोली, राजू निंदी, आनंद, चिंटू, जयेश आणि एका अनोळखी इसमाने ही हत्या केली. ही हत्या करताना आरोपीने पेव्हर ब्लॉक आणि सिमेंटच्या ठोकळ्याचा वापर केला. एका आरोपीने स्वतःच्या ताब्यातील कटरच्या साह्याने विजयच्या मानेवर वार केले होते. 

आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी
या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कालिदास कोली, जग्गू मुंगर, सोनू स्वामी, रामू कोली आणि जयेश यांचा समावेश आहे.
 

Web Title: Vijay murder case police suspect earlier dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.