विजय सिंग मृत्यू प्रकरण : खोटी तक्रार देणाऱ्या जोडप्याविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 10:05 PM2019-10-30T22:05:53+5:302019-10-30T22:07:55+5:30
या प्रकरणात विजयला मारहाण करून त्याच्याविरोधात खोटी तक्रार देणाऱ्या जोडप्याविरोधातही पोलिसांनी आता गुन्हा नोंदवल्याची माहिती
मुंबई - वडाळा टी. टी. पोलिसांच्या चौकशीदरम्यान विजय सिंग या २६ वर्षीय तरुणाच्या मृत्यूनंतर स्थानिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन उभे केले होते. त्यानंतर पाच पोलिसांना निलंबित देखील करण्यात आले. या प्रकरणात विजयला मारहाण करून त्याच्याविरोधात खोटी तक्रार देणाऱ्या जोडप्याविरोधातही पोलिसांनी आता गुन्हा नोंदवल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रणव अशोक यांनी दिली.
दिवाळी सणानिमित्त २७ ऑक्टोबर रोजी वडाळा परिसरात राहणारा विजय हा त्याच्या दोन भावांसोबत त्याच्या होणाऱ्या पत्नीला भेटण्यासाठी रात्री घराबाहेर पडला होता. ट्रक टर्मिनस येथे काही कामानिमित्त त्याने दुचाकी थांबवली. त्यावेळी त्याच्या गाडीची हेडलाइट समोर अंधारात असलेल्या एका प्रेमी जोडप्यावर पडल्याने वाद निर्माण झाला. त्यावेळी समोरील तरुणाने त्याच्या मित्रांना बोलवून विजयला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. गस्तीवर असलेले पोलीस त्या ठिकाणी आल्यानंतर पोलिसांनी विजय, त्याच्या दोन भावांना आणि जोडप्यातील माणसाने बोलावलेले तरुणांना ताब्यात घेतले.
पोलीस ठाण्यात आल्यानंतर या तरुणांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर काही वेळातच विजय सिंगच्या छातीत अचानक दुखायला लागले. त्यामुळे त्याला तात्काळ सायन रुग्ण्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
जोडप्याने खोटी माहिती देत विजयला मारहाणही केल्याचे चौकशीत पुढे आले. या घटनेनंतर वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात खोटी माहिती दिल्याप्रकरणी जोडप्यावर आणि विजयला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर भा. दं. वि. कलम 341, 323, 504,506(2), 182, 211,34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी वडाळा टी. टी. पोलीस अधिक तपास करत असून नागरिकांनी कायदा हातात न घेता शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.