Vikas Dubey Encounter : विकास दुबे गेला; परंतु प्रश्न कायमच राहिले! एन्काऊंटरला रंगमुलामा देणे चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 04:28 AM2020-07-12T04:28:57+5:302020-07-12T06:26:58+5:30

काही पोलीस अधिकाऱ्यांना तर एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून माध्यमांनी ‘गौरवले‘ही! परंतु त्याच वेळी काही पोलीस अंडरवर्ल्डच्या काही गँगसाठी काम करीत असल्याचे आरोपही झाले.

Vikas Dubey Encounter: Vikas went to Dubey; But the question remained forever! | Vikas Dubey Encounter : विकास दुबे गेला; परंतु प्रश्न कायमच राहिले! एन्काऊंटरला रंगमुलामा देणे चिंताजनक

Vikas Dubey Encounter : विकास दुबे गेला; परंतु प्रश्न कायमच राहिले! एन्काऊंटरला रंगमुलामा देणे चिंताजनक

Next

- अ‍ॅड. उज्वल निकम
(विशेष सरकारी वकील)

गुन्हेगारांचे पोलिसांकडून होणारे एन्काऊंटर समाजासाठी नेहमीच समाधानकारक, प्रसंगी आनंददायक ठरत आले आहेत. गेल्या काही वर्षांत अशा प्रकारच्या एन्काऊंटरच्या घटना फारशा घडल्या नाहीत. मात्र, मुंबईमध्ये जेव्हा अंडरवर्ल्डच्या डॉन, शार्पशूटर, राईट हँड आदींनी धुमाकूळ घातला होता तेव्हा पोलिसांकडून एन्काऊंटर केल्याच्या अनेक घटना घडल्या. यावर अनेक चित्रपटांचीही निर्मिती करण्यात आली. काही पोलीस अधिकाऱ्यांना तर एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून माध्यमांनी ‘गौरवले‘ही! परंतु त्याच वेळी काही पोलीस अंडरवर्ल्डच्या काही गँगसाठी काम करीत असल्याचे आरोपही झाले. पुढे जाऊन या एन्काऊंटरच्या घटनांची न्यायालयीन चौकशी सुरु झाली. कारण प्रत्येक एन्काऊंटरच्या वेळी पोलिसांकडून जरी स्वबचावासाठी किंवा आत्मसंरक्षणासाठी दिलेले प्रत्युत्तर असे सांगितले गेले असले तरी त्यासंदर्भात अनेक प्रश्न, शंकाही उपस्थित होत होत्या. त्यामुळे एन्काऊंटर की बनावट चकमक याचा पदार्फाश करण्यासाठी न्यायालयीन चौकशी गरजेची होती, तसेच न्यायालयीन प्रक्रियेतून गुन्हेगाराला शिक्षा ठोठावण्यात आली, तर न्यायव्यवस्थेचे पावित्र्य, त्यावरील विश्वास वाढतो आणि सामान्य नागरिकाच्या मनातही एक प्रकारची सुरक्षितता वाढते. त्यामुळे न्यायालयीन चौकशी सुरू झाल्यानंतर मुंबईतील एन्काऊंटरची संख्या घटल्याचे दिसून आले.
त्यानंतर एन्काऊंटर हा विषय पुन्हा चर्चेत आला तो गेल्या वर्षी हैदराबादमधील घटनेनंतर. सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातील आरोपींचे हैदराबाद पोलिसांनी एन्काऊंटर केल्याची चर्चा देशभरात झाली. इतकेच नव्हे तर त्याबद्दल आनंदोत्सव साजरा झाला. अनेकांनी सदर एन्काऊंटर करणाºया पोलिसांच्या प्रतिमा घेऊन अक्षरश: मिरवणुका काढल्या आणि त्यांना ‘हिरो’ बनवले. कारण बलात्कारासारख्या गंभीर आणि मानवतेला काळिमा फासणाºया गुन्ह्यांमध्ये आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी आणि ती लवकरात लवकर व्हायला हवी असे जनतेला वाटत असते. म्हणूनच ज्या न्यायप्रणालीमध्ये दिरंगाईने न्याय मिळतो, त्या न्यायपालिकेवरचा आणि न्यायव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास उडत जातो. पण कायद्याचा अभ्यासक आणि कायद्याचा विद्यार्थी म्हणून मला एन्काऊंटरविषयीचे हे जनमानस चिंता करण्यास भाग पाडते. कारण त्यातून पोलिसच चांगला न्याय देऊ शकतात, असे तर लोकांना वाटू लागणार नाही ना अशी साधार भीतीही वाटते.

एन्काऊंटरला रंगमुलामा देणे चिंताजनक
हैदराबादमधील गुन्हेगार आणि नुकताच एन्काऊंटरमध्ये मारला गेलेला उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड विकास दुबे ही दोन्ही प्रकरणे भिन्न आहेत. त्यामुळे त्यांची सरमिसळ करुन किंवा एकाच चष्म्यातून त्याकडे पाहून चालणार नाही. विकास दुबे मारला गेला याबद्दल खेद व्यक्त करण्याचे काहीच कारण नाही; परंतु ज्या परिस्थितीत हे एन्काऊंटर घडत आहेत आणि पोलीस ज्या पद्धतीने त्याला रंगमुलामा देत आहेत ते चिंताजनक आहे, तसेच त्याच्या एन्काऊंटरवरुन ज्यापद्धतीचे राजकारण रंगले आहे, ते खेदजनक आहे. (पूर्वार्ध)

Web Title: Vikas Dubey Encounter: Vikas went to Dubey; But the question remained forever!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.