चकमकीपूर्वी पोलीस ठाण्यातूनच फोन , विकास दुबेच्या सहकाऱ्याने दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 04:48 AM2020-07-06T04:48:14+5:302020-07-06T04:48:52+5:30
चौबेपूर पोलीस ठाण्याचे प्रमुख विनय तिवारी यांना निलंबित केलेले असताना शंकर याने हा जबाब दिलेला आहे, हे विशेष.
कानपूर : कानपूरमधील ८ पोलिसांच्या हत्याकांडप्रकरणी मुख्य आरोपी विकास दुबे याचा एक सहकारी दया शंकर अग्निहोत्री याला कल्याणपूरमध्ये चकमकीनंतर अटक करण्यात आली. त्याच्या पायला गोळी लागली आहे. त्याला लाला लजपतराय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दया शंकर अग्निहोत्री याच्यावर २५ हजार रुपयांचे बक्षीस होते. शंकर याने पोलिसांना सांगितले की, २ जुलैच्या रात्री बिकरू गावात झालेल्या चकमकीपूर्वी विकास दुबेला चौबेपूर पोलीस ठाण्यातून एक फोन आला होता. त्यानंतर विकासने पोलिसांशी दोन हात करण्यासाठी आपल्याला आणि अन्य सहकाऱ्यांना फोन करून घरी बोलवून घेतले. चौबेपूर पोलीस ठाण्याचे प्रमुख विनय तिवारी यांना निलंबित केलेले असताना शंकर याने हा जबाब दिलेला आहे, हे विशेष.
कानपूरचे पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी सांगितले की, तिवारी यांना ताब्यात घेण्यात आलेले नाही, तर त्यांना पोलीस लाइनला पाठविण्यात आले आहे. जर त्यांच्याविरुद्ध एकही पुरावा सापडला तर त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली जाईल. चकमकीत ८ पोलिसांचा मृत्यू झाल्यानंतर गुंड विकास दुबे याचे घर उद्ध्वस्त करण्यात आले आहे. या घरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
दुबे नेपाळमध्ये पळाला?
या घटनेच्या तीन दिवसांनंतरही विकास दुबेला पकडण्यात यश आलेले नाही. त्याला पकडण्यासाठी २५ पेक्षा अधिक टीम तयार करण्यात आल्या आहेत. शेजारी राज्ये आणि नेपाळच्या सीमेनजीकही त्याचा शोध सुरू आहे.
पोलिसांना असा संशय आहे की, तो नेपाळ अथवा मध्यप्रदेशात पळाला असावा. त्याची माहिती देणाºयास १ लाख रुपयांची रक्कम जाहीर करण्यात आली आहे. या घटनेपूर्वी गावातील वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. पोलीस संबंधित व्यक्तींची चौकशी करीत आहेत.