कोरोना चाचणीसाठी नववधूचा पदर उचलण्यावरून राडा झाला; आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 08:48 AM2021-05-18T08:48:19+5:302021-05-18T08:49:22+5:30
Crime News: अलीगढच्या टप्पल भागातील सौरौला भागातील ही घटना आहे. आरोग्य विभागाची टीम चाचण्या करत होती. गावातील लोकांनी आपली अँटीजन टेस्ट केली आणि सॅम्पल दिले. याचवेळी अचानक असे काही घडले की गाववाल्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला केला.
उत्तर प्रदेशच्या गावा गावांत कोरोनाचे संक्रमण वेगाने वाढू लागले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न होऊ लागले आहेत. गावा गावांतील प्राथमिक आरोग्य केंद्रांना आधुनिक उपकरणांनी सुसज्ज केले जात आहे. तसेच आरोग्य विभागाच्या टीमला घराघरात जावून ग्रामस्थांची कोरोना टेस्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, नववधुच्या डोक्यावरील पदर उचलल्यामुळे मोठा राडा झाला आहे. (Villagers beating corona testing team in Tappal. )
अलीगढच्या टप्पल भागातील सौरौला भागातील ही घटना आहे. आरोग्य विभागाची टीम चाचण्या करत होती. गावातील लोकांनी आपली अँटीजन टेस्ट केली आणि सॅम्पल दिले. याचवेळी अचानक असे काही घडले की गाववाल्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. त्यांना पळवून पळवून मारले, आरोग्य अधिकाऱ्यांचे कागदही फाडून टाकण्यात आले. त्यांच्याकडील कोरोना किट हिसकावून घेतले. या मारहाणीत दोन आरोग्य कर्मचारी जखमी झाले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिला आणि तक्रार दिली आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोग्य विभागाची टीम गावात कोरोना टेस्ट करत होती. गावातील जवळपास 37हून अधिक महिला आणि पुरुषांची चाचणी करण्यात आली होती. तेव्हा एक नवविवाहित महिला कोरोना टेस्ट करण्यासाठी चाचणी केंद्रात आली. कोरोना टेस्ट करण्यासाठी तिच्या नाकातून आणि तोंडातून सॅम्पल घ्यावे लागतात. मात्र, नुकतेच लग्न झाल्याने ती नववधू काही तिचा पदर डोक्यावरून हटविण्यास तयार नव्हती. यानंतर लॅब टेक्निशिअन सौरव अत्री याने महिलेला पदर हटविण्यास सांगितले.
गाव वाल्यांच्या म्हणण्यानुसार जिथे चाचणी घेण्यात येत होती, तिथे समोर गावातील काही व्यक्ती आणि तरुण उभे होते. त्या लोकांना घाबरून त्या नववधूने कोरोना चाचणीसाठी सॅम्पल घेण्यासाठी पदर वर करण्यास नकार दिला. आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्या लोकांना तिथून जाण्यास सांगितले. यावरून चिडलेल्या त्या तरुणांनी आरोग्य अधिकाऱ्यांवर हल्लाच केला. आरोग्य विभागाच्या टीमने अज्ञात लोकांविरोधात टप्पल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.