फरार प्रेमी युगुलाला ग्रामस्थांनी पकडून केली मारहाण, रॉकेल टाकून जिवंत जाळण्याची केली तयारी आणि....
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 04:46 PM2021-07-16T16:46:01+5:302021-07-16T16:49:44+5:30
Crime News: ग्रामस्थांनी एका प्रेमी युगुलाला पकडून त्यांना बांधून घातले. त्यानंतर या जोडप्याला मारहाण करण्यात आली. या युगुलाच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना जिवंत जाळण्याची तयारी केली होती.
पाटणा - बिहारमधील जमुई जिल्ह्यातील लक्ष्मीपूर पोलीस ठाणे क्षेत्रात अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. येथील हरमा पहाडी गावामध्ये ग्रामस्थांनी एका प्रेमी युगुलाला पकडून त्यांना बांधून घातले. त्यानंतर या जोडप्याला मारहाण करण्यात आली. या युगुलाच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना जिवंत जाळण्याची तयारी केली होती. मात्र या प्रकाराची खबर समजताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन प्रेमी युगुलाला ग्रामस्थांच्या तावडीतून सोडवले. ( The villagers caught the fugitive lover Yugula, beat him up, prepared to burn him alive by throwing a rockel )
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी चार मुलांची आई असलेली गिरजा देवी तिचा प्रियकर रंजित दास याच्यासोबत फरार झाली होती. दरम्यान या फरार प्रेमी युगुलाला ग्रामस्थांनी पकडले आणि पुन्हा गावात आणून झाडाला बांधून घातले. तिथे त्यांना मारहाण करण्यात आली. प्रेमी युगुल हे हरमा पहाडी गावातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
हरमा पहाडी गावातील महिला गिरिजा देवी आणि त्याच गावात राहणारा तरुण रंजित दास यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होतो. पाच दिवसांपूर्वी दोन्ही कुटुंबांमध्ये या विषयावरून वादही झाला होता. त्यानंतर चार मुलांची आई असलेली गिरिजा देवी ही तिच्या मुलांसोबत फरार झाली. शुक्रवारी सकाळी गावातील काही लोकांनी या दोघांना लक्ष्मीपूर परिसरातील जंगलामध्ये पकडले. त्यानंतर त्यांना गावात आणण्यात आले. गावात आणल्यानंतर या महिलेला विजेच्या खांबाला तर तिच्या प्रियकराला झाडाला बांधून घातले. त्यानंतर दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर केरोसिन घालून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लक्ष्मीपूर ठाण्याच्या प्रमुखांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या जोडप्याला ग्रामस्थांच्या ताब्यातून सोडवण्यात आले. प्रेमी जोडप्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तसेच पोलिसांनी तपास सुरू केला. दोघांच्या जबाबाच्या आधारावर एफआयआर दाखल करून घेण्यात आली आहे. या घटनेला दुजोरा दिला आहे. प्रेमी युगुलाला मारहाण केली जात असल्याचे समजताच आम्ही घटनास्थळी धाव घेतली आणि या युगुलाची सुटका केली, असे त्यांनी सांगितले.