मुले चोरणारी टोळी समजून गावकऱ्यांचा महिलांना चोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 06:25 AM2019-11-29T06:25:41+5:302019-11-29T06:25:55+5:30
अनैतिक संबंध शोधण्यासाठी पत्नीने आपल्या दोन मैत्रिणींसह बुरखा घालून पतीचा फिल्मी स्टाइलने पाठलाग केला खरा, मात्र मुले पळविणारी टोळी असल्याचा संशय घेत या तीनही महिलांना गव्हाण येथील नागरिकांनी चांगलाच चोप दिला.
उरण : अनैतिक संबंध शोधण्यासाठी पत्नीने आपल्या दोन मैत्रिणींसह बुरखा घालून पतीचा फिल्मी स्टाइलने पाठलाग केला खरा, मात्र मुले पळविणारी टोळी असल्याचा संशय घेत या तीनही महिलांना गव्हाण येथील नागरिकांनी चांगलाच चोप दिला. गव्हाण गावात बुधवारी रात्री घडलेल्या या प्रकाराची न्हावा-शेवा बंदर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
नवी मुंबईत मुख्याध्यापिका, शिक्षिका, व्यवस्थापक म्हणून या तिघी काम करतात. त्यांच्यापैकी एकीच्या पतीचे गव्हाण गावातील विवाहित महिलेशी संबंध आहेत. तिला समजवायला या तिघी पतीचा पाठलाग करीत गव्हाण गावात पोहोचल्या. त्यांनी महिलेच्या मुलाचा फोटो आणला होता. तो फोटो लोकांना दाखवून त्या महिलेचा पत्ता शोधत होत्या. घर सापडल्यावर त्यांचे या महिलेबरोबर भांडण झाले. ते बघण्यासाठी गावातील महिला जमा झाल्या. महिलांचा गराडा पाहून या तिघी घाबरून पळू लागल्या. गावातील महिलांनी त्यांचा पाठलाग केला. अख्खा गाव त्यांचा पाठलाग करू लागला. त्यांना पकडून तपासणी केली असता त्यांच्याजवळ मुलाचा फोटो सापडल्याने ग्रामस्थांना त्या मुले पळविणाºया टोळीतील असल्याचा संशय आला. खातरजमा न करता महिलांसह गावकऱ्यांनीही त्यांना नाहक मारहाण सुरू केली. न्हावा-शेवा पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी गावात येत त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांनी पोलिसांना न जुमानता मारहाण करणे सुरूच ठेवले. पोलिसांनी समजाविल्यावर गावकºयांनी त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशीत खरी घटना उघडकीस आली. पोलिसांनी त्यानंतर रात्री अडीचच्या सुमारास त्यांना सोडले.