Vinayak Mete Accident Update: विनायक मेटेंच्या चालकाला अखेर अटक; अपघाताला कारणीभूत असल्याचा ठपका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 03:03 PM2022-11-17T15:03:51+5:302022-11-17T15:04:21+5:30
अपघात एवढा भीषण होता, की मेटे बसलेली डावी बाजू पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी मेटे बीडकडून मुंबईकडे येत होते.
शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांच्या कारचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर तीन महिन्यांपूर्वी भीषण अपघात झाला होता. यामध्ये मेटे यांचा मृत्यू झाला होता. या अपघाताला जबाबदार असलेल्या मेटेंच्या कार चालकाला आज अटक करण्यात आली. सीआयडीने बुधवारी रसायनी पोलीस ठाण्यात कार चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता.
अपघात एवढा भीषण होता, की मेटे बसलेली डावी बाजू पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी मेटे बीडकडून मुंबईकडे येत होते. पहाटे पाच वाजता हा अपघात झाला होता. चालकाने मेटेंना तासभर मदतच मिळाली नसल्याचा आरोप केला होता. चालक एकनाथ कदम याने रस्त्यावर गाड्या थांबविण्यासाठी झोपलो पण होतो, पण गाड्या थांबल्या नाहीत, असे म्हटले होते.
हाच चालक दोषी असल्याचे सीआयडी तपासात निष्पन्न झाले आहे. विनायक मेटेंच्या कारचा चालक एकनाथ कदमवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आज त्याला अटक करून न्यायालयात हजर केले जाणार आहे. ३०४ a, 304 -2 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कदम हा मेटेंची कार १४०-१५० किमीच्या वेगाने चालवत होता. भातन बोगद्याजवळ आल्यावर त्याने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने उजव्या बाजुच्या लेनमध्ये गाडी घातली. परंतू तिथे आणखी एक गाडी ओव्हरटेक करत होती. ओव्हरटेक करता येणार नाही हे समजल्यावरही त्याने त्या लेनमधून गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. यामुळे मेटेंची कार डाव्या बाजुने आदळली.