पिंपरीत वाहनांची तोडफोड करत माजविली दहशत, सहा जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 04:25 PM2019-03-07T16:25:34+5:302019-03-07T16:28:40+5:30
परिसरातील वाहनांची कोयता, लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने तोडफोड करत दहशत माजविली.
पिंपरी : नागरिकांना शिवीगाळ करीत रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करत दहशत माजविल्याप्रकरणी सहा जणांच्या टोळक्यावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली.
ललिता राजाभाऊ फुले (वय ३२, रा. राधिका बिल्डिंग, लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आश्विन चव्हाण (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) व इतर चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिंपळे गुरव, लक्ष्मीनगर येथील गल्ली नंबर ८ येथे मंगळवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास आश्विन चव्हाण याच्यासह चार ते पाच जणांचा जमाव जमला. नवनाथ माझी टीप पोलिसांना देतो त्याचे परिणाम काय होतात ते आता मी दाखवतो, असे म्हणत आरोपींनी फिर्यादीला व येथील रहिवाशांना शिवीगाळ केली. तसेच परिसरातील वाहनांची कोयता, लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने तोडफोड करत दहशत माजविली. दरम्यान, ललिता फुले यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किंमतीची सोनसाखळी हिसकावून नेली. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत.