आचारसंहितेचा भंग; उत्तर पूर्व मुंबईतून लाखोंचा दारूसाठा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 16:52 IST2019-04-05T16:26:06+5:302019-04-05T16:52:31+5:30
उत्तर पूर्व मुंबईचे निवडणूक अधिकारी विवेक गायकवाड यांच्या नेतृत्त्वाखाली ३२ जणांचे भरारी पथक, ३२ जणांची स्थिर पथक सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.

आचारसंहितेचा भंग; उत्तर पूर्व मुंबईतून लाखोंचा दारूसाठा जप्त
मुंबई - निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर पूर्व मुंबईत जवळपास ३ लाखांचा देशी, विदेशी दारुंचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्याच बरोबरच रिक्षाही जप्त करण्यात आली आहे. हा साठा कुणासाठा आणण्यात आला होता? याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच शिवाजी नगर परिसरातून दोन लाखाचा दारू साठा जप्त करण्यात आला आहे. ही गुन्हे शाखेने कारवाई केली आहे.
उत्तर पूर्व मुंबईचे निवडणूक अधिकारी विवेक गायकवाड यांच्या नेतृत्त्वाखाली ३२ जणांचे भरारी पथक, ३२ जणांची स्थिर पथक सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. तसेच व्हिडीओग्राफरही उमेदवार, पक्ष कार्यकर्त्यांवर नजर ठेवून आहेत. मुलुंड ते मानखुर्द शिवाजी नगर परिसरात नाकाबंदी दरम्यान जवळपास २ लाख ९० हजार रुपयांचा दारुसाठा पथकाच्या हाती लागला. १८ मार्च ते २४ मार्च पर्यंतची ही कारवाई आहे. पोलिसांच्या मदतीने केलेल्या कारवाईत रिक्षाही जप्त करण्यात आली आहे. हा दारुसाठा कुठून व कुणाच्या सांगण्यावरुन आणण्यात आला. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. कार्यकर्त्यांसाठी हा दारुसाठा आणला असल्याची माहिती समजते. तर, काही ठिकाणी मतदारांना आमिष दाखविण्यासाठी याचा वापर होत होता का? या दिशेनेही तपास सुरु आहे.
बुधवारपर्यंत निवडणूक आयोगाच्या सिव्हिजिल (सिटीजन व्हिजिलन्स) अॅपवर उत्तर पूर्व मुंबईत आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी २० तक्रारी धडकल्या. तक्रारींचेही तात्काळ निवारण करण्यात आल्याचेही निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यात, सोसायटी तसेच सार्वजनिक ठिकाणी राजकीय पक्षाचे फलक काढले नसल्याच्या तक्रारींचे प्रमाण जास्त होते.