कोरोना नियमांचे उल्लंघन करुन बर्थडे पार्टी, पोलिसांनी छापा टाकला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 03:26 PM2021-07-10T15:26:15+5:302021-07-10T15:26:31+5:30
एपीएमसी आवारातील सतरा प्लाझा इमारतीमधील पाम अटलांटिस हॉटेलवर पोलीसांनी गुरुवारी पहाटे कारवाई केली आहे. आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश असतानाही सदर हॉटेल सुरु असल्याची माहिती परिमंडळ उपायुक्त सुरेश मेंगडे यांना मिळाली होती
नवी मुंबई : मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेलमध्ये चाललेल्या पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. एपीएमसी आवारातील सतरा प्लाझा इमारतीमधील हॉटेलमध्ये हि विशेष बर्थडे पार्टी सुरु होती. त्यामध्ये नवी मुंबईसह ठाणे, मुंबई येथून ६४ जणांनी हजेरी लावली होती. कोरोना नियमांचे उल्लंघन करुन येथे वाढदिवस साजरा करण्यात येत होता. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी पार्टीवर छापा टाकला.
एपीएमसी आवारातील सतरा प्लाझा इमारतीमधील पाम अटलांटिस हॉटेलवर पोलीसांनी गुरुवारी पहाटे कारवाई केली आहे. आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश असतानाही सदर हॉटेल सुरु असल्याची माहिती परिमंडळ उपायुक्त सुरेश मेंगडे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक उमेश गवळी, सहायक निरीक्षक वसीम शेख, उपनिरीक्षक संजय चव्हाण यांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने गुरुवारी पहाटेच्या सुमारास सतरा प्लाझा इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर पाहणी केली. यावेळी हॉटेल पाम अटलांटिसचा दरवाजा बंद असून आतमध्ये पार्टी सुरु असल्याचे आढळून आले. यानुसार पथकाने छापा टाकला असता, आतमध्ये हॉटेल मालकासह १३ कामगार व बर्थडे पार्टीसाठी जमलेल्यांची गर्दी आढळून आली. त्यांच्याकडे चौकशी केली असता बर्थडे पार्टीसाठी सर्वजण त्याठिकाणी आल्याचे समोर आले.
दरम्यान, हॉटेल मालक निकुंज सावला यांच्यासह १३ कामगार व ६४ ग्राहकांवर एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनामुळे हॉटेलमध्ये ग्राहकांना बसण्याची मुभा देण्यात आलेली नाही. यानंतरही बर्थडे पार्टीसाठी हॉटेल खुले करून त्याठिकाणी त्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यापूर्वी देखील पाम अटलांटिस व इतर अनेक हॉटेल, हुक्का पार्लर यांच्यावर पोलीसांनी कारवाई केलेल्या आहेत. त्यानंतर देखील व्यावसायिकांकडून महापालिकेच्या आदेशांची पायमल्ली केली जात असल्याने त्यांच्यावर कायद्याचा धाक नसल्याचे दिसून येत आहे.