दारू पिऊन वाहतुकीची शिस्त मोडली, ३४८ जणांवर फौजदारी गुन्हे दाखल!
By भूषण.विजय.रामराजे | Published: May 10, 2023 04:38 PM2023-05-10T16:38:50+5:302023-05-10T16:39:16+5:30
जिल्ह्यात ९ आणि १० एप्रिल रोजी पोलिस दलाकडून विशेष मोहीम राबवण्यात आली होती.
नंदुरबार : दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात पोलिस दलाने विशेष मोहीम राबवली होती. पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात राबवलेल्या या मोहिमेतून गत चार महिन्यांत ३४८ जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांचे वाहन परवाने निलंबित करण्याचे प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन विभागाला देण्यात आले आहेत. जिल्ह्यात ९ आणि १० एप्रिल रोजी पोलिस दलाकडून विशेष मोहीम राबवण्यात आली होती. यांतर्गत जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी करून दुचाकी, चारचाकी व इतर वाहनांची तपासणी करण्यात आली. यातून ४४ वाहन चालकांवर कारवाई झाली होती.
दरम्यान ही मोहीम ११ एप्रिलपासून सुरू ठेवण्यात आली होती. यांतर्गत ९ मेपर्यंत नंदुरबार शहर पोलिस ठाणे हद्दीत २३, उपनगर पोलिस ठाणे ७, नंदुरबार तालुका पोलिस ठाणे ५, नवापूर पोलिस ठाणे १२, विसरवाडी पोलिस ठाणे १३, शहादा पोलिस ठाणे २७, धडगाव पोलिस ठाणे १३, म्हसावद पोलिस ठाणे १०, सारंगखेडा पोलिस ठाणे १४, अक्कलकुवा पोलिस ठाणे- २३, तळोदा पोलिस ठाणे १४, मोलगी पोलिस ठाणे हद्दीत ५ असे एकूण १६६ गुन्हे संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आले. यातून जिल्ह्यात १ जानेवारी ते ९ मे या काळातील मद्यपी चालकांवरच्या गुन्ह्यांची संख्या ही ३४८ झाली आहे.