तासगाव: वायफळे-सावळजच्या युवकांमध्ये जोरदार हाणामारी; युवक जखमी, यात्रेला गालबोट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 10:44 PM2022-01-31T22:44:25+5:302022-01-31T22:45:06+5:30
या मारामारीमुळे यल्लमा देवी यात्रेला गालबोट लागले आहे.
तासगाव: वायफळे (ता. तासगाव) येथील यल्लमा देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडी शर्यतीवेळी वायफळे व सावळज येथील युवकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी झालेल्या दगडफेकीत काही युवक जखमी झाले. वादावादीत वायफळेच्या युवकांनी सावळज ग्रामपंचायतीच्या एका सदस्याने आणलेली चारचाकी गाडी फोडली. या मारामारीमुळे यल्लमा देवी यात्रेला गालबोट लागले आहे.
वायफळे येथील यल्लमा देवीची यात्रा गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. यात्रेनिमित्त गावात विविध धार्मिक आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये देवीचा नैवेद्य, किच यांसह लोकनाट्य तमाशा व ऑर्केस्ट्राचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. याशिवाय लहान व मोठ्या गटातील युवकांच्या धावण्याच्या शर्यती तसेच बैलगाडी शर्यतीचेही आयोजन केले होते.
रविवारी दुपारी वायफळे-यमगरवाडी रस्त्यावरील माळावर बैलगाडी शर्यती झाल्या. यावेळी बैलगाडी शर्यतीच्या मैदानाशेजारी असणाऱ्या द्राक्षबागेत धूळ उडू नये म्हणून एका शेतकऱ्याने या भागात प्रेक्षकांना येण्यास मज्जाव केला. त्या भागात दुचाकी येत असल्याने संबंधित शेतकऱ्याने दोरी आडवी बांधली होती. यातूनच संबंधित शेतकरी व सावळजच्या काही युवकांमध्ये वादावादी झाली. वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाले.
यानंतर सावळजच्या युवकांनी गावाकडे फोन करून एका ग्रामपंचायत सदस्यासह अन्य युवकांना बोलावून घेतले. सावळजचे हे सर्वजण बैलगाडी शर्यतीच्या माळावर आल्यानंतर पुन्हा वायफळे व सावळजच्या युवकांच्या दोन गटात पुन्हा हाणामारी झाली.
यावेळी झालेल्या दगडफेकीत काही युवक जखमी झाले. संतप्त झालेल्या वायफळे येथील युवकांनी सावळजच्या ग्रामपंचायत सदस्याने आणलेल्या माेटारीवर दगडफेक केली. या वादावादीमुळे शर्यतीच्या मैदानावरील वातावरण तणावपूर्ण बनले. मारामारीच्या घटनेमुळे शांततेत सुरू असणाऱ्या यल्लमा देवीच्या यात्रेला गालबोट लागले आहे.