भायखळा कारागृहाला दिली शिवसेनेच्या शिष्टमंडळ आणि महिला आयोगाच्या सदस्यांनी भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 07:10 PM2018-07-21T19:10:08+5:302018-07-21T19:10:43+5:30
जे. जे. रुग्णालयानातून ७९ रुग्णांना डिस्चार्ज
मुंबई - भायखळा महिला कारागृहात काल अचानक तब्येत खालावल्याने ८५ महिला व १ पुरुष कैदी यांना जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली होती. यामध्ये चार वर्षाच्या बाळाचा देखील समावेश होता. या सर्व कैद्यांची चौकशी करण्यासाठी शिवसेना शिष्टमंडळाने भायखळा कारागृह आणि जे. जे. रूग्णालयाला भेट देत कैद्यांच्या तब्येतीची चौकशी केली. तर भायखळा कारागृहाला महिला आयोगाच्या सदस्या विंदा कीर्तिकर आणि ऍड आशा लांडगे यांनी भेट दिली. दरम्यान, जे. जे. रुग्णालयानातून ७९ रुग्णांना डिस्चार्ज दिला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
शिवसेना आमदार मनिषा कायंदे आणि महिला विभाग संघटक किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली महिला शिष्टमंडळाने जे. जे. रूग्णालयामध्ये जाऊन कैद्यांच्या तब्येतीबद्दल विचारपूस केली. क्वालरा होऊ नये यासाठी दिल्या गेलेल्या औषधामुळे तसेच दूषित पाणी प्यायल्याने कैद्यांना त्रास झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे. मात्र, यावर डॉक्टरांच्या रिपोर्ट अद्याप तरी आलेला नाही. दरम्यान, कारागृहातील सोयीसुविधांमध्ये आणखी सुधारणा होण्याची गरज असल्याचे यांनी म्हटले आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून संपूर्ण घेटनेच्या चौकशीची मागणी करणार असल्याची माहिती महिला विभाग संघटक किशोरी पेडणेकर यांनी दिली.