गुगलवर व्हिटॅमिन सीच्या गोळ्या महागात, महिलेला बसला लाखोंचा फटका
By गौरी टेंबकर | Published: September 25, 2023 03:37 PM2023-09-25T15:37:18+5:302023-09-25T15:37:26+5:30
वांद्रे पोलिसात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मुंबई: गुगलवरून विटामिन सी च्या गोळ्या ऑनलाइन खरेदी करणे एका महिलेला महागात पडले. याप्रकरणी तिने वांद्रे पोलिसात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
तक्रारदार शीला कपूर (६४) यांचा गारमेंट व्यवसाय होता. मात्र सध्या त्या घरीच आहेत. त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, २२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास त्या गुगलवर विटामिन सी च्या गोळ्यांचा शोध घेत होत्या. त्यादरम्यान त्यांना एक वेबसाईट सापडली ज्यात विटामिन सी च्या गोळ्यांचा डब्बा ३ हजार ९५ रुपयांना असल्याचे दिसले. त्यानुसार तो मागवण्यासाठी त्यांनी प्रोसीड पेमेंट लिंकवर क्लिक केले आणि एचडीएफसी बँकेचे एक पेज ओपन होत त्यावर ओटीपी विचारला गेला.
त्यानुसार कपूर यांनी तो ओटीपी त्यात टाकल्यावर ऑर्डरचे पैसे मिळाल्याचा मेसेज प्राप्त झाला. मात्र काही वेळातच एचडीएफसी बँकेच्या कस्टमर केअर ने कपूर यांना फोन करत तुम्ही संबंधित साइटवरून २ लाख ५७ हजार ६०९ रुपयांचे काही खरेदी केले का अशी विचारणा केली. त्यावर मी फक्त ३ हजार ९५ रुपयाची ऑर्डर दिल्याचे तक्रारदाराने सांगितले.
तुमच्या क्रेडिट कार्डमधून २ लाख ५७ हजार ६०९ रुपये काढण्यात आल्याचे कस्टमर केअरने त्यांना सांगत ऑर्डर कॅन्सल करा असे सुचवले. त्यानुसार कपूर यांनी ऑर्डर कॅन्सल करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा संबंधित साईटचे पेजच उघडले नाही आणि आपली फसवणूक झाल्याचे कपूर यांच्या लक्षात आले. अखेर याची तक्रार त्यांनी वांद्रे पोलिसात केली.