व्हिवो कंपनीची ४६५ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त; ६२ हजार कोटी चीनला पाठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 06:44 AM2022-07-08T06:44:43+5:302022-07-08T06:45:09+5:30
भारतीय कर प्रणालीची फसवणूक, प्राप्त माहितीनुसार कंपनीचे माजी संचालक बीन लू यांनी भारतामध्ये १८ कंपन्या स्थापन केल्या होत्या. या कंपन्या प्रामुख्याने मुंबई, पुणे, नागपूर, दिल्ली, लखनौ, कोलकाता, अहमदाबाद या शहरांतून स्थापन केल्या होत्या.
मुंबई : एकीकडे कंपनी तोट्यात असल्याचे दाखवत भारतात कर न भरणे, मात्र दुसरीकडे आपल्या मूळ चिनी कंपनीला तब्बल ६२ हजार ४७६ कोटी रुपये पाठविणे, अशी फसवणूक आणि मनी लाँड्रिंग केल्याप्रकरणी ईडीने व्हीवो कंपनीची ४६५ कोटी रुपयांची मालमत्ता बुधवारी जप्त केली. जप्त केलेल्या ११९ बँकांत असलेल्या ६६ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी, दोन किलो सोने, ७३ लाख रुपयांची रोख रक्कम अशा मालमत्तेचा समावेश आहे. व्हीवो या चिनी कंपनीवर तसेच कंपनीशी संबंधित अन्य काही चिनी कंपन्यांच्या मुंबई, दिल्लीसह, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा या राज्यांत मंगळवारी एकूण ४८ ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती. या छापेमारीतून जी कागदपत्रे ईडीच्या ताब्यात लागली, त्यावरून कंपनीने भारतीय कर प्रणालीची काही हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उजेडात आले आहे.
कंपनीमधील चिनी समभागधारकांनी भारतामध्ये आपली बनावट ओळख सादर केल्याचे उजेडात आल्यानंतर कंपनीत काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय तपास यंत्रणांना आला होता. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैशांचे व्यवहार झाल्याची माहिती पुढे आल्यावर ईडीने तपास सुरू केला होता. या छाप्यांदरम्यान कंपनीत कार्यरत भारतीय तसेच चिनी कर्मचाऱ्यांची ईडीने चौकशी केली. मात्र, ईडीचे अधिकारी कार्यालयात आल्यानंतर काही कर्मचाऱ्यांची तेथून पळ काढल्याचे समजते. तसेच, काही महत्त्वपूर्ण डिजिटल उपकरणेदेखील लपविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता ईडीने ही उपकरणे ताब्यात घेतली असून त्याद्वारेदेखील अधिक तपास केला जाणार आहे.
प्राप्त माहितीनुसार कंपनीचे माजी संचालक बीन लू यांनी भारतामध्ये १८ कंपन्या स्थापन केल्या होत्या. या कंपन्या प्रामुख्याने मुंबई, पुणे, नागपूर, दिल्ली, लखनौ, कोलकाता, अहमदाबाद या शहरांतून स्थापन केल्या होत्या. या कंपन्यांमार्फत मोठ्या प्रमाणावर पैशांची फिरवाफिरवी होत होती. कंपनीने गेल्या काही वर्षांत भारतात तब्बल १ लाख २५ हजार १८५ कोटी रुपयांच्या मोबाइल व पूरक साहित्याची विक्री केली. या विक्रीनंतर कंपनीने त्या अनुषंगाने कर भरणा करणे आवश्यक होते. मात्र, कंपनीने आपल्या सर्व कंपन्या तोट्यात असल्याचे दाखवत कर भरणा केला नाही. याउलट, आपल्या एकूण विक्रीच्या ६२ हजार ४७६ कोटी रुपये चीनमध्ये पाठविले. हे व्यवहार तपास यंत्रणांच्या रडारवर आल्यानंतर कंपनीचे तत्कालीन संचालक बीन लू २६ एप्रिल २०१८ रोजी भारतातून चीनमध्ये परत गेले.