देश सोडून पळून जात होता ३५५८ कोटींच्या घोटाळ्याचा मास्टरमाइंड; ED च्या सापळ्यात अडकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 12:37 IST2025-03-02T12:37:16+5:302025-03-02T12:37:51+5:30
या बनावट गुंतवणूक योजनेत जवळपास ३५५८ कोटी रूपये हडप करण्यात आल्याचा आरोप आहे.

देश सोडून पळून जात होता ३५५८ कोटींच्या घोटाळ्याचा मास्टरमाइंड; ED च्या सापळ्यात अडकला
नवी दिल्ली - दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ईडीने ३५५८ कोटी रूपये कथित घोटाळ्याचा मास्टरमाइंड सुखविंदर सिंग खरूर आणि डिंपल खरूर यांना अटक केली आहे. हे दोघेही देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते परंतु लुक आऊट नोटिशीमुळे एअरपोर्टवरच दोघांना रोखण्यात आले. व्यूनाऊ मार्केटिंग सर्व्हिसेज लिमिटेड आणि त्याच्याशी निगडीत कंपन्यांविरोधात मनी लॉन्ड्रिंग अंतर्गत तपास सुरू आहे. त्यातूनच ही कारवाई करण्यात आली.
काय आहे क्लाउड पार्टिकल घोटाळा?
ईडीने सुखविंदर आणि डिंपलला अटक केल्यानंतर जालंधरच्या कोर्टात हजर केले. त्यानंतर कोर्टाने दोघांना ईडीची कोठडी सुनावली आहे. हा घोटाळा Cloud Partcle Scam नावाने ओळखला जातो. ज्यात गुंतवणूकदारांना खोटी प्रलोभने देत त्यांना सेल अँन्ड लीज बँक मॉडेलच्या माध्यमातून फसवण्यात आले. उत्तर प्रदेशातील गौतमबुद्ध नगरमध्ये पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याची प्राथमिक चौकशी करताना हा प्रकार समोर आला. त्यानंतर ईडीने यावर कारवाई करत तपासात व्यूनाऊ गुपचे सीईओ सुखविंदर सिंग खरूर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून हा घोटाळा केल्याचं उघड झालं.
३५५८ कोटींचा घोटाळा
ईडीच्या माहितीनुसार, क्लाउड पार्टिकल टेक्नोलॉजीच्या नावाखाली गुंतवणूकदारांकडून मोठी रक्कम घेण्यात आली परंतु त्यांचा खरा व्यापार तो नव्हताच. गुंतवणूकदारांना मोठी स्वप्ने दाखवून त्यांची फसवणूक करण्यात आली. या बनावट गुंतवणूक योजनेत जवळपास ३५५८ कोटी रूपये हडप करण्यात आल्याचा आरोप आहे. घोटाळ्यातून मिळालेला पैसा कमिशन, महागड्या कार, सोने, हिरे, शेल कंपन्यात वापरण्यात आला.