चोरी करून धूम ठोकणाऱ्यांना नदीतून पोहत केले जेरबंद; पोलिसांचा सिनेमा स्टाइल थरार...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 08:42 AM2023-08-23T08:42:08+5:302023-08-23T08:42:57+5:30
भंगारावर मारला डल्ला, ग्रामस्थांच्या मदतीने पाठलाग
लोकमत न्यूज नेटवर्क, वाडा : एका खासगी कंपनीत चोरी सुरू असल्याचे समजताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांच्या येण्याची चाहूल लागताच बिथरलेल्या चोरट्यांनी पोलिसांवरच हल्ला करून धूम ठोकली. मात्र, पोलिसांनीही हार न मानता त्यांचा पिच्छा पुरवला. दोन किलोमीटरपर्यंत हे सुरूच होते. दोन किलोमीटरपर्यंत थरारक पाठशिवणीचा खेळ सुरूच होता. पळणाऱ्या चोरट्यांनी पुढे नदी दिसताच त्यात झोकून देत पळण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मागावर अलेल्या पोलिसांनीही क्षणाचाही विलंब न लावत नदीत उड्या घेतल्या. पोहत जाऊन अखेर चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या.
भंगारावर मारला डल्ला
हा थरार एखाद्या सिनेमाप्रमाणे होता. वाड्यातील मेट गावाच्या हद्दीत ग्रामस्थांनी याचि देही याचि डोळा असा हा थरार अनुभवला. सोमवारी (दि. २१) चारच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला. पोलिसांनी या कारवाईत कंपनीतील लोखंडी भंगारावर डल्ला मारणाऱ्या रवाब शहा (वय ६०), मेरानूर शहा (२९), वैभव जाधव (२४), अब्दुल शहा (३८) आणि चिराग पाटील (२२) यांना अटक करून कर्तव्य निभावतानाच धाडसाची वाहवा मिळवली.
ग्रामस्थांच्या मदतीने पाठलाग
मेट गावच्या हद्दीत असलेल्या मेटाफिल्ड काॅइल प्रा. लिमिटेड या बंद असलेल्या कंपनीतील लोखंडी भंगार सामानावर चोरटे डल्ला मारत असल्याची गोपनीय माहिती कुडूस पोलिसांना मिळताच त्यांनी तेथे धाव घेत धाड टाकली. यावेळी चोरट्यांनी तेथून पळ काढला. त्यानंतरही पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचा पाठलाग करीत त्यांना ताब्यात घेतले.
...आणि पोलिसांनी नदीत उडी घेतली
पोलिस आल्याचे समजताच चोरट्यांनी प्रथम: पोलिसांवर हल्ला चढवला. यात दोन पोलिस किरकोळ जखमी झाले. पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. चोरट्यांनी नदीत उड्या टाकल्यानंतर पोलिस हवालदार चेतन सोनावणे यांनी प्रथम नदीत उडी घेऊन चोराला पकडले. त्यानंतर दुसऱ्या पोलिसाने चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या.