झोपेतून उठवून तरुणावर गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 12:55 AM2020-06-19T00:55:20+5:302020-06-19T00:55:28+5:30
चेंबूरमधील घटना; सराईत गुंडासहित तिघाना अटक
मुंबई : घरात झोपलेल्या एका तरुणाला उठवून त्याच्यावर गोळीबार करण्याची घटना गुरुवारी पहाटे चेबूर येथील वजीर बाबा चाळीत घडली. गोळीबारात सादिक इनायत खान (३६, रा. वजीर बाबा चाळ, चेंबूर) गंभीर जखमी असून त्याच्या पाठीत आणि डाव्या हाताच्या पंजात गोळी शिरली आहे. सायन रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची टिळकनगर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
याप्रकरणी सराईत गुंड नवनीत सिंग सुरेंद्रसिंग राणा, यासीन अन्सारी यांना टिळकनगर पोलिसांनी अटक केली असून एक जण फरारी आहे. पूर्ववैमनस्यातून त्यांनी हे कृत्य केल्याचे निरीक्षक लता सुतार यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेलरिंगचे काम करणाऱ्या सादिक खान हा पत्नी मेहरुनिसा समवेत चाळीत राहतो. पहाटे त्याचा दरवाजा जोरजोरात ठोठावत असल्याने त्याने दरवाजा उघडून कोण आहे, असे विचारले. तेव्हा बाहेर असलेल्या चौघांपैकी एकाने रिव्हॉल्वरमधून त्याच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. त्याच्या आवाजाने पत्नी मेहरूनिसा हिने ओरडून शेजाऱ्यांना जागे केले. तिच्या आवाजाने हल्लेखोर पळून गेले. पोलिसांना कळविल्यानंतर निरीक्षक लता सुतार व त्याच्या सहकार्यांनी विविध पथके नेमून शिताफीने तपास सुरु केला. नवनीत राणा व अन्य दोघाना अटक केली. त्यानी गुन्ह्याची कबुली दिली. मे महिन्यात नवनीतचा भाऊ इंदरकुमार याला मारहाण केलेल्या सलीम सिद्दीक याला जामीन मिळवून देण्यासाठी खान दापत्याने मदत केली होती. त्याचा राग मनात धरून बुधवारी तुरुंगातून बाहेर आलेल्या नवनीतने बदला घेण्यासाठी अन्य तिघासमेवत हल्ल्याचा कट रचला. यामध्ये रौफ पटेल हा अद्याप फरार झाला आहे.