पिस्तूल घेऊन फिरला...पोलिसांनी पकडला! साताऱ्यातील घटना
By दत्ता यादव | Published: January 10, 2024 11:10 PM2024-01-10T23:10:47+5:302024-01-10T23:11:00+5:30
सातारा : येथील मंगळवार तळ्यावर संशयितरीत्या फिरणाऱ्या एका तरुणाकडे पोलिसांना देशी बनावटीचे पिस्तूल व १ जिवंत काडतूस आढळून आले. ...
सातारा : येथील मंगळवार तळ्यावर संशयितरीत्या फिरणाऱ्या एका तरुणाकडे पोलिसांना देशी बनावटीचे पिस्तूल व १ जिवंत काडतूस आढळून आले. संबंधित तरुणाला पोलिसांनी अटक केली असून, ही कारवाई दि. ९ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता करण्यात आली. योगेश भीमराव देवकर (३०, रा. मोरे काॅलनी, मंगळवार पेठ, सातारा) असे पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, योगेश देवकर हा मंगळवार तळ्यावर संशयितरीत्या फिरत होता. शाहूपुरी पोलिस ठाण्यातील सचिन पवार हे गस्त घालत असताना तो त्यांना दिसला. पवार यांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस आढळून आले. या पिस्तुलाची किंमत सुमारे ६५ हजार रुपये आहे.
पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याची कसून चौकशी सुरू केली आहे. त्याने हे पिस्तूल कोठून आणले व कोणाला विकायचे होते की, अन्य कोणावर नेम साधायचा होता, हे मात्र, अद्याप समोर आले नाही. शाहूपुरी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, पोलिस उपनिरीक्षक एस. बी. साबळे हे अधिक तपास करीत आहेत.