मुलगी विकत घ्यायची आहे? मुलींना फसविण्याचे असेही रॅकेट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 10:23 AM2023-02-05T10:23:20+5:302023-02-05T10:23:30+5:30
कधी नोकरीचे आमिष दाखवून... कधी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करत त्यांना भेटायला बोलवायचे आणि मग सुरू होतो एक भयानक खेळ... मुलींचे अपहरण करायचे... लग्नासाठी मुलगी हवी असलेल्या कुटुंबाला त्यांची विक्री करायची आणि बळजबरीने तिचे लग्न लावायचे... मुंबईत आणि महाराष्ट्रात अशी अंगावर काटा आणणारी प्रकरणे उघडकीस आली आहेत.
आशिष सिंह, विशेष प्रतिनिधी
लासोपारा (पालघर) येथील अल्पवयीन मुलीशी सोशल मीडियावर मैत्री केली. स्वत:ला सैन्यदलातील अधिकारी असल्याचे सांगत तिला भेटायला बोलावले आणि तिचे अपहरण करत राजस्थानमध्ये तिला लग्नासाठी विकले गेले. कुरारमधील (मुंबई) मुलीला राजस्थानमध्ये मोठा इव्हेंट असल्याचे सांगत केटरिंगच्या कामासाठी नेले आणि अपहरण केले... किंवा शाळकरी मुलीला नशेचे डोस देऊन तिची राजस्थानमध्ये विक्री करणे असो... या सर्व प्रकरणांत एक समान धागा आहे.
मुलींचे अपहरण करून त्यांना राजस्थान किंवा हरयाणात
न्यायचे. वेश्या व्यवसायात ढकलण्याची धमकी देऊन तिचे शोषण करायचे आणि लग्नासाठी मुलगी हवी असलेल्या एखाद्या कुटुंबाला बळजबरीने तिला विकायचे. खरेदी-विक्री होणाऱ्या या मुलींना स्थानिक भाषेत ‘पारो’ म्हटले जाते. लाख-दोन लाखांत एजंटांकडून त्यांना खरेदी केले जाते. लग्नासाठी मुलगी न मिळणाऱ्या तरुणाशी तिचे लग्न लावून दिले जाते.
राजस्थान आणि हरयाणात काही कुटुंबातील मुलांची लग्न जुळत नाहीत. त्यामुळे नाइलाजाने ते पैसे देऊन आपल्या मुलाचे लग्न बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, झारखंड, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून अपहरण केलेल्या मुलींशी लावून देतात.
मुंबई, महाराष्ट्रातून अपहरण केलेल्या काही मुली पोलिसांनी शोधल्यानंतर मिळाल्या, मात्र त्या पूर्ण खचून गेलेल्या होत्या. देशभरात सुरू असलेल्या या अनैतिक व्यवसायातील अनेक मुलींचा शोध अजून लागलेला नाही. त्या कुठे असतील?
मुलींना फसविण्याचे असेही रॅकेट
- एजंट, सोशल मीडियावर बनावट प्रोफाईल तयार करतात. ते अकाऊंट खूप काळापासून ॲक्टिव्ह असल्याचे दाखवितात. मग सुरू होतो खेळ.
- देशातील वेगवेगळ्या शहरांतील सुंदर मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची. मैत्री करायची, भेटायला बोलवायचे. काहींना नोकरीचे आमिष दाखवायचे, अपहरण करून त्यांना विकायचे.
- काही एजंट तर गरीब मुलींशी लग्न करून त्यांना राजस्थान किंवा हरयाणाला घेऊन जातात आणि त्यांची विक्री करतात, त्यांचे बळजबरीने लग्न लावून देतात.
एजंटच महत्त्वाचा !
- राजस्थान आणि हरयाणातील या खरेदी-विक्री व्यवहाराला ‘पारो बिझनेस मॉडेल’ म्हणतात.
- हे मॉडेल एखाद्या कॉर्पोरेट बिझनेस मॉडेलप्रमाणेच कार्यरत आहे. यात एजंटची भूमिका महत्त्वाची असते.
- मुलीचे अपहरण केल्यानंतर एजंट तिला आपल्याकडेच बंदिस्त ठेवतात. मुलींचे शारीरिक शोषण केले जाते.
- वेश्या व्यवसायात ढकलण्याची त्यांना धमकी दिली जाते. दरम्यान, त्यांचे मानसिक आणि शारीरिक शोषण केले जाते.
- या मुली मनाने खचून जातात. पुन्हा कुटुंबाला कसे भेटणार, असा प्रश्न त्यांना सतावतो. त्या स्वत:ला अपराधी समजतात.
- एजंटचे त्यातून अर्थातच फावते आणि तो लग्नासाठी मुलगी हवी असलेल्या कुटुंबाला त्यांची विक्री करतात.
- लग्नाला तयार न होणाऱ्या मुलींना वेश्या व्यवसायात ढकलले जाते.