नागपुरातील जरीपटक्यामध्ये सापडला भोपाळमधील वाँटेड आरोपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 09:03 PM2020-07-16T21:03:41+5:302020-07-16T21:05:21+5:30
खुनाचा प्रयत्न करण्याऱ्या भोपाळच्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली व भोपाळ पोलिसांच्या ताब्यात दिले. तो दोन वर्षापासून जरीपटका येथे दडून बसला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खुनाचा प्रयत्न करण्याऱ्या भोपाळच्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली व भोपाळ पोलिसांच्या ताब्यात दिले. तो दोन वर्षापासून जरीपटका येथे दडून बसला होता. लालचंद गोवर्धनदास आसवानी (४५) असे या आरोपीचे नाव असून, तो बैरागढ येथील रहिवासी आहे. त्याच्या विरोधात भोपाळमध्ये खुनाचा प्रयत्न, चोरी यासह ४९ गुन्हे दाखल आहेत.
अनेक प्रकरणांमध्ये सहभाग असल्याने लालचंद चर्चेत होता. भोपाळ पोलिसांपासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी तो नागपुरात आला होता. तो जरीपटक्यामधील दयानंद पार्कजवळ एका घरी कुटुंबीयांसह भाड्याने राहात होता. येथे तो लहान-मोठी कामे करायचा. क्राईम ब्रँचच्या युनिट क्रमांक-२ ला यासंदर्भात गुप्त माहिती मिळाली. त्याच्याकडे चोरीच्या दोन दुचाकी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी ही माहिती भोपाळ पोलिसांना पुरविली. भोपाळ पोलीस आल्यावर त्याला अटक करून रवाना झाले. या कारवाईत पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर, पीएसआय लक्ष्मीछाया तांबुस्कर, एएसआय मोहन साहू, हवालदार संतोष मदनकर, रामनरेश यादव, शिपाई रवी साहू, शेषराव राऊत, योगेश गुप्ता, निनाजी तायडे आदी सहभागी होते.